ocw ने ४३३ किमी जलवाहिन्या बदलूनही गळतीचा ‘पाझर’ सुरूच
Nagpur शहराची पाणीगळती रोखण्यासाठी नागपूरकरांच्या तिजोरीतून तब्बल १८६ कोटी ८० लाख रुपये खर्च करून ४३३ किलोमीटरच्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. मात्र, कोट्यवधींचा हा खर्च अक्षरशः पाण्यात गेल्याचे चित्र समोर आले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण तब्बल ३९ टक्के राहिले असून, ऑरेंज सिटी वॉटर कंपनी निर्धारित उद्दिष्ट गाठण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. या बोगस कारभाराविरोधात काँग्रेसचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अभिजीत झा यांनी आक्रमक पवित्रा घेत OCW च्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या लेखी उत्तरातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कराराच्या वेळी ५२ टक्के असलेले महसूलविहीन पाण्याचे प्रमाण २०२४-२५ मध्ये ३०.७८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट OCW ला देण्यात आले होते. प्रत्यक्षात हे प्रमाण ३९ टक्क्यांवरच अडकले आहे. म्हणजेच, शहरात सोडल्या जाणाऱ्या प्रत्येक १०० लिटर पाण्यापैकी ३९ लिटर पाण्याचा हिशेबच लागत नसून, यातून पालिकेला कोणताही महसूल मिळत नाही.
‘सीजेपी’ थंड पडलेली नाही! आंदोलन स्थगितीच्या चर्चांना आशुतोष रांकांचे उत्तर!
२४×७ पाणीपुरवठ्याचा मोठा गाजावाजा करणाऱ्या OCW च्या कारभारातील विरोधाभास पालिकेच्याच आकडेवारीतून चव्हाट्यावर आला आहे. धरमपेठ झोनमधील धंतोली , हनुमाननगरमधील चिंचभवन आणि लक्ष्मीनगरमधील त्रिमूर्तीनगर येथे मुबलक पाणीपुरवठा होत असताना, त्याच धरमपेठ झोनमधील सेमिनरी हिल्स परिसरात अवघे अडीच तास पाणी येते. याशिवाय नेहरूनगर झोनमधील दिघोरी, खरबी, सक्करदरा (२ तास), नंदनवन (२.५ तास), हुडकेश्वर (२ ते ३ तास) आणि सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी, बोरियापुरा, वांजरी (२ ते ४ तास) या भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकाच शहरात आणि एकाच झोनमध्ये पाणीवाटपातील ही मोठी असमानता धक्कादायक आहे.
केवळ OCW च नव्हे, तर या कंपनीवर अंकुश ठेवण्यात महापालिकेच्या जलप्रदाय विभागप्रमुखांनाही पूर्णपणे अपयश आल्याचा घणाघात अभिजीत झा यांनी केला आहे. “दुष्काळ आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट समोर असताना शहरातील प्रभागांमध्ये पाणीवाटपातील ही तफावत अन्यायकारक आहे. प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष जनतेची लूट करणाऱ्या OCW ला पाठीशी घालत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. १८६.८० कोटी रुपये खर्चून आणि ४३३ किमी जलवाहिन्या बदलून प्रत्यक्ष किती पाणी वाचले आणि महसूल किती वाढला, याचा हिशेब प्रशासनाने द्यावा. तसेच उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या OCW ची सखोल चौकशी करून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि पाणीपुरवठ्याची संपूर्ण सूत्रे मनपाच्या जलप्रदाय विभागाने आपल्या हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?
दरम्यान, १८६.८० कोटींच्या जलवाहिनी कामांचा सविस्तर तपशील आणि NRW ची अद्ययावत आकडेवारी प्रशासनाने तात्काळ सार्वजनिक करावी, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये समान व न्याय्य पाणीवाटपासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा, असेही झा यांनी स्पष्ट केले आहे.








