व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?

वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?

श्याम खोडे, आणि अनिल केंदळे यांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकांची चर्चा

Washim : लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी पक्षांतर्गत राजकारणात मात्र वेगवेगळे प्रवाह दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान नेतृत्वामध्येही समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेतृत्वावरून सुरू असलेली रस्सीखेच, गटातटांचे राजकारण आणि पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद यामुळे वाशिम भाजपमधील अंतर्गत समीकरणे चर्चेचा विषय ठरत आहेत.

वाशिम मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले लखन मलिक, मेडशीचे माजी आमदार विजय जाधव आणि माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांच्यासह काही जुने नेते सध्या पक्षाच्या सक्रिय कार्यक्रमांमध्ये पूर्वीइतके दिसत नसल्याची चर्चा आहे. राजू पाटील राजे यांचीही पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमधील अनुपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे पक्षाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या जुन्या नेतृत्वाला सध्या किती महत्त्व दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बोरगाव मंजू एमआयडीसीसाठी भाजप नेत्यांची २५० एकर जमीन?

दुसरीकडे, आमदार श्याम खोडे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे आणि शहराध्यक्ष मनीष मंत्री यांच्यातील राजकीय समन्वयाची चर्चा सुरू आहे. तर वाशिमच्या नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी सर्वांना सोबत घेऊन सौहार्दपूर्ण राजकारण करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये या वेगवेगळ्या भूमिका जाणवत असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाचे स्वतंत्र प्रवाह असल्याची चर्चा रंगत आहे.

महिला मोर्चातील अंतर्गत मतभेदांचाही मुद्दा समोर आला आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे पक्षातील नाराजीच्या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. मात्र, या बाबींच्या आधारे पक्षात मोठी दुफळी असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची भूमिका पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. माजी आमदारांसह सर्व प्रमुख नेत्यांना पक्षाच्या कार्यक्रमांची निमंत्रणे दिली जातात. काही नेते अनुपस्थित राहिल्यास त्यामागे त्यांची वैयक्तिक व्यस्तता असू शकते. महिला मोर्चातील मतभेदांबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पक्षाचा विस्तार होत असताना जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि नव्याने पक्षात आलेल्यांना संघटनेत सामावून घेणे आवश्यक असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विविध विचारांचे कार्यकर्ते पक्षात सहभागी होणे ही संघटनेची ताकद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सहायक आयुक्तांना नगरसेवकाकडून मारहाण? सीसीटीव्ही फुटेजमुळे मनपा वर्तुळात खळबळ

एकूणच, निवडणुकांनंतर वाशिम भाजपमध्ये संघटनात्मक विस्तारासोबतच नेतृत्वातील समन्वय, जुन्या नेत्यांचे स्थान आणि नव्या कार्यकर्त्यांना मिळणारे महत्त्व हे मुद्दे चर्चेत आले आहेत. ही केवळ राजकीय चर्चा आहे की प्रत्यक्षात पक्षांतर्गत नाराजीचे संकेत आहेत, हे आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आणि नेत्यांच्या सक्रिय सहभागातून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!