विधानावर नाराजी; टीकेचा अधिकार असला तरी संवेदनशीलता राखण्याची अपेक्षा
Akola रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकनेते अजितदादांबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील असल्याची भावना माजी आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या २८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी, ‘आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?’ असा उपरोधिक सवाल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या विधानानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी अजित पवार यांनी यापूर्वी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा आपण उपरोधिकपणे उल्लेख केल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, एखाद्या राजकीय नेत्याच्या विधानावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला, तरी आज आपल्यात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना किमान संवेदनशीलता आणि सामाजिक भान राखणे अपेक्षित आहे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
अजितदादा हे केवळ एका राजकीय पक्षाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व होते. पाणी, सिंचन, शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्यांच्या कार्याबाबत किंवा निर्णयांबाबत मतभेद असू शकतात. त्यांच्या धोरणांवर टीकाही होऊ शकते. मात्र, त्यासाठी उपरोधिक टिप्पणीचा आधार घेणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे मिटकरी म्हणाले.
आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या विधानाचा उद्देश उपरोध असल्याचे स्पष्ट केले असले, तरी उपरोध आणि अवमान यांमधील सीमारेषा ओळखणे आवश्यक आहे. राजकीय टीका करताना व्यक्तीचे योगदान आणि तिच्या स्मृतींचा आदर राखणे हीदेखील सार्वजनिक जीवनातील जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप
अजितदादा आज आपल्यात नाहीत; मात्र महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान आणि कार्याचा ठसा कायम राहणार आहे. व्यक्ती जाते, पण तिचे कार्य बोलत राहते. त्यांच्या निर्णयांवर जरूर चर्चा व्हावी, त्यांच्या कामाचे मूल्यमापनही व्हावे; परंतु निधनानंतर त्यांच्या नावाचा उपरोधिक वापर करून स्मृतींचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राजकीय मतभेदांपेक्षा माणुसकी आणि सामाजिक संवेदनशीलता मोठी असते, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असे मिटकरी म्हणाले.








