भाजपचे विरोधकांना खुले आव्हान; अन्यथा अकोलेकरांची जाहीर माफी मागा
Akola बोरगाव विस्तारित एमआयडीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने काही लोकप्रतिनिधींची अडीचशे एकर जमीन असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी हिंमत असेल तर संबंधित लोकप्रतिनिधींची नावे आणि त्यांच्या जमिनीचे सातबारे उतारे जनतेसमोर आणावेत. अन्यथा अकोला जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी दिले आहे.
बोरगाव विस्तारित एमआयडीसी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निशाणा साधला. जिल्ह्यातील जनतेला विरोधकांची भूमिका चांगलीच माहिती आहे. विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेत अकोला एमआयडीसीच्या विस्ताराचा निर्णय घेतला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी विकासाचा रथ वेगाने पुढे नेत असताना विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे प्रत्येक विकासकामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवरकर यांनी केला.
सत्ता गेल्यामुळे हताश झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक बाबतीत नकारात्मक भूमिका घेतली जात आहे. जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्याऐवजी विकासकामांना विरोध करणे हाच त्यांचा एकमेव धंदा झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप
एकीकडे निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायचे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधींवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करायची, ही दुटप्पी भूमिका निंदनीय असून लोकशाहीसाठी घातक असल्याचेही शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.








