व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार!

९ डिसेंबरला विधानभवनावर शेगाव ते नागपूर ट्रॅक्टर मोर्चा धडकणार

Nagpur: राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफी आणि प्रलंबित शासकीय मदतीच्या मुद्द्यांवरून आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेगाव ते नागपूर असा भव्य ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. ४ डिसेंबरपासून शेगाव येथून सुरू होणारा हा मोर्चा ९ डिसेंबर रोजी नागपुरातील विधानभवनावर धडकणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महायुती सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांतील उभी पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सरकारकडून मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याची हमीही पूर्ण झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?

राज्य सरकार केंद्राकडे मदतीची मागणी केल्याचे सांगत असले, तरी केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊनही सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मोर्चात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान अपघाताचाही मुद्दा उपस्थित केला. या अपघाताची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असून, त्यासंदर्भातील तांत्रिक प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. केवळ संबंधित कंपनीची बाजू मांडून चालणार नाही, तर अपघातामुळे निर्माण झालेल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा आग्रहही त्यांनी धरला. या पत्रकार परिषदेला खासदार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, माजी आमदार चरण वाघमारे, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासकराजामुळे गावगाडा अडखळला; राजकीय समीकरणांनाही फटका!

एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलनाची तयारी, तर दुसरीकडे अजित पवार अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करून रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापवले आहे. आता या मोर्चाला महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचा कितपत प्रतिसाद मिळतो आणि सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!