व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?

भाजपचे स्वागताचे पाऊल; विलिनीकरणाऐवजी युतीचा नवा पर्याय चर्चेत!

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी करून घेण्यास भाजपने अनुकूल भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील महायुतीत चौथा सहकारी म्हणून पवारांच्या पक्षाला सामावून घेण्याचीही भाजपची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा तिढा कायम असतानाच स्वतंत्र युतीचा पर्याय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

एका वृत्तानुसार, शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असेल, तर त्यांचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यांने मांडल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तर ती आदर्श परिस्थिती असेल; मात्र सत्तेतील वाटपाच्या गुंतागुंतीमुळे ते शक्य नसेल, तर स्वतंत्र सहकारी म्हणून पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यास भाजपची हरकत नसल्याचे या मंत्र्याने स्पष्ट केले. भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यानेही अंतिम निर्णय शरद पवार यांच्या पक्षालाच घ्यायचा असल्याचे म्हटले आहे.

प्रशासकराजामुळे गावगाडा अडखळला; राजकीय समीकरणांनाही फटका!

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यानंतर विलिनीकरणाबाबत भाजपची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. आता भाजपकडून अनुकूल संकेत मिळत असल्याचे वृत्त असले, तरी दोन्ही पक्षांतील नेतृत्व आणि सत्तावाटपाचे प्रश्न कायम आहेत. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांसोबत बैठका केल्याची माहितीही वृत्तात देण्यात आली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपकडून व्यक्त होत असलेली तयारी आणि पवार गटाची सार्वजनिक भूमिका यामध्ये अद्याप अंतर दिसून येत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाचे नेतृत्व कोणाकडे राहणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव, निवडणूक चिन्ह आणि महाराष्ट्रातील बहुतांश आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आहेत. त्यामुळे विलिनीकरण झाल्यास शरद पवार गटाची भूमिका काय असेल, सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य केले जाईल का आणि सुप्रिया सुळे यांचे पक्षातील स्थान काय राहील, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

चंद्रपुरात ‘पालकमंत्री हटाव’चा स्फोट! शिंदे सेनेच्या मोहिमेला भाजपच्या जोरगेवार समर्थक गटनेत्याची साथ; उईकेंची खुर्ची धोक्यात

शरद पवार गट स्वतंत्र चौथा सहकारी म्हणून महायुतीत सहभागी झाल्यास भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सत्तावाटपाचे गणित नव्याने मांडावे लागेल. मंत्रिपदे आणि राजकीय प्रतिनिधित्वाबाबतही फेरविचार करावा लागू शकतो. त्याचबरोबर एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार गटाला केंद्रातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीपासून दूर जावे लागेल.

त्यामुळे सध्या तरी शरद पवार यांच्या पक्षाची महायुतीत एन्ट्री निश्चित झालेली नाही. मात्र भाजपने स्वागताची तयारी दर्शविल्याच्या वृत्तामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. विलिनीकरण, स्वतंत्र युती की विरोधी आघाडीतच कायम राहण्याचा निर्णय, यापैकी शरद पवार कोणता पर्याय निवडतात, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!