हिवाळी अधिवेशनापूर्वीच आदिवासी मंत्री अशोक उइके यांना घरचा आहेर
Chandrapur : हिवाळी अधिवेशनापूर्वी चंद्रपूरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कारभाराविरोधात शिंदे सेनेने सुरू केलेल्या ‘पालकमंत्री हटाव’ मोहिमेला आता थेट भाजपच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांची साथ मिळू लागल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.
२०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून येऊनही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आणि डॉ. उईकेंकडे पालकमंत्रिपद सोपवल्याने स्थानिक पातळीवर आधीच खदखद होती. आता दोन वर्षांच्या कारभारावर आक्षेप घेत शिंदे सेनेचे ललित कसाट यांच्या नेतृत्वात ‘पालकमंत्री हटाव कृती समिती’ स्थापन करून स्वाक्षरी अभियान छेडण्यात आले आहे. या संपूर्ण घडामोडीतील सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट म्हणजे भाजप महानगर अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनीच या मागणीच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
विशेष म्हणजे, चंद्रशेखर शेट्टी हे भाजपचे महानगर अध्यक्ष आणि महापालिकेतील गटनेते असून, त्यांची ओळख आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक म्हणून आहे. तर पालकमंत्री हटाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ललित कासट हे यापूर्वी आमदार जोरगेवार यांचे स्वीय सहायक होते. महापालिका निवडणुकीत पत्नीला भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. कासट हे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचेही निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे एकेकाळी एकाच राजकीय वर्तुळात वावरणारे हे दोन चेहरे आता पालकमंत्री हटाव मोहिमेत वेगवेगळ्या भूमिकांतून सक्रिय झाले आहेत. या दोघांच्या सहभागामुळे या मोहिमेचे राजकीय संदर्भ अधिक गडद झाले असून, चंद्रपूरच्या सत्ताधारी राजकारणातील अंतर्गत समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, आदिवासी विकास विभागातील प्रलंबित प्रश्न आणि वादग्रस्त प्रकरणांवरूनही नाराजीचे वातावरण असून सर्वपक्षीय नगरसेवकांना मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीतीलच घटक आणि पदाधिकारी आमनेसामने आल्याने या राजकीय संघर्षाचा फैसला चंद्रपुरात होणार की मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाच्या दरबारात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.








