जुन्याच ‘कोलार-कन्हान बॅरेज’ योजनेची पुन्हा घोषणा; प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्न कायम
Nagpur : शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत असताना अपुऱ्या पावसामुळे नागपूरवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १,४०० कोटी रुपयांची ‘कोलार-कन्हान बॅरेज’ योजना राबविण्याची घोषणा महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मात्र, यापूर्वीही पालकमंत्री असताना बावनकुळे यांनी याच योजनेची घोषणा केली होती. त्यावेळी पुढे ठोस प्रगती न झाल्याने आता जुन्याच योजनेची नव्याने घोषणा होत असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे यावेळी तरी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नागपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून लोकसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. सध्या शहराला पेंच आणि कन्हान नदीच्या माध्यमातून दररोज सुमारे ७५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही नद्यांचे उगम आणि प्रवाह मध्य प्रदेशाशी संबंधित असल्याने तेथील जलसाठे आणि धरणांमुळे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशातील धरणांमुळे नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज अधिक तीव्र केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार!
कोलार-कन्हान बॅरेज योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहमती दर्शविल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आगामी हिवाळी अधिवेशनात या योजनेला मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या पुढील पाच दशकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, निधीची उपलब्धता, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकामाची कालमर्यादा याबाबतची स्पष्टता महत्त्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे, नागपूर महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी ओसीडब्ल्यू कंपनीकडे सोपविली आहे. मात्र, पाणीगळती, नासाडी आणि चोरी रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचा आरोप होत आहे. उलट पाणी वितरणाचा खर्च वाढत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत महापौरांनी अल्टिमेटम दिला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?
एकीकडे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १,४०० कोटींच्या नव्या प्रकल्पाची घोषणा केली जात असताना दुसरीकडे सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी कायम आहेत. त्यामुळे केवळ नवीन जलस्रोत निर्माण करणे पुरेसे ठरणार नसून वितरणातील गळती, चोरी आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे. जुन्या घोषणेनंतर रखडलेल्या योजनेला आता प्रत्यक्ष मंजुरी आणि निधी मिळतो का, तसेच नागपूरकरांना भविष्यात नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळतो का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.








