व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट

एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट

उपमहापौर आणि गटनेत्यांवरही लक्ष! संघटनात्मक बदलांचे संकेत

Mumbai: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकद वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकांमधील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्याची तयारी शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन, उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा तसेच पक्षाची धोरणे प्रभावीपणे राबविण्याबाबत तातडीच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात महापालिकांमध्ये शिवसेनेची ‘भाकरी फिरणार’ का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर देत आहेत. कुठे आंदोलनांच्या माध्यमातून, तर कुठे मेळावे आणि पदाधिकारी संमेलनांच्या माध्यमातून पक्षविस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनीही आपल्या पक्षातील स्थानिक नेतृत्वाच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे ठरविले आहे.

नागपूरच्या पुढील ५० वर्षांच्या पाणीटंचाईवर १,४०० कोटींचा उतारा?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांनी महापालिकांतील नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांच्या कामाचा आढावा घेण्याची तयारी केली आहे. प्रभागातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या, पक्षाची संघटनात्मक ताकद आणि पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे, महापालिकेतील उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कामकाजाचेही मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती आहे. महापालिकेतील निविदा प्रक्रिया, विकासकामे आणि लोकाभिमुख उपक्रमांमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका कशी आहे, यावर पक्षश्रेष्ठींचे लक्ष असल्याचे सांगितले जाते. या आढाव्यानंतर पुढील आठवड्यात काही महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी होणाऱ्या या बैठकीत शिंदे नगराध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाणीटंचाई यांचा आढावा यावेळी घेतला जाणार असल्याचे समजते.

याशिवाय नगराध्यक्षांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी, प्रभागांतील विकासकामे, महायुतीतील समन्वय, स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि पक्षवाढीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार!

महापालिकांतील नगरसेवकांपासून राज्यातील नगराध्यक्षांपर्यंत नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याच्या या प्रक्रियेमुळे शिवसेनेतील संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार का, निष्क्रिय नेतृत्वाला बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का आणि महापालिकांतील पक्षाची रणनीती बदलणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बैठकांमधून नेमके कोणते निर्णय समोर येतात आणि शिवसेनेत प्रत्यक्षात कितपत ‘भाकरी फिरते’, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!