व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण १५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!

१५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!

New delhi: संसदेच्या आगामी अधिवेशनाबाबत राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील संसदीय अधिवेशनाच्या तयारीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्र्यांना १५ डिसेंबरपूर्वी अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परदेश दौरे टाळून दिल्लीत उपलब्ध राहण्याचा सल्लाही मंत्र्यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संसदेचे अधिवेशन १५ डिसेंबरपूर्वी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसदेच्या पुढील अधिवेशनाबाबत चर्चा झाली. संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समिती अधिवेशनाची सुरुवात आणि कालावधी निश्चित करणार आहे. दरम्यान, संबंधित मंत्रालयांना संसदीय कामकाजासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात संसदेचे कामकाज सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

लोकसभेतील सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ किती?

संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अधिवेशन अधिकृतरीत्या संस्थगित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे यंदा सभागृहांच्या कामकाजातील खंडाचा कालावधी विक्रमी ठरला आहे. विरोधी पक्षांनीही हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष अधिवेशन बोलावण्याच्या शक्यतेमुळे या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

आगामी अधिवेशनात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा संबंध मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आला आहे. लोकसभेतील सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून वाढवून ८५० पर्यंत नेण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकार या विधेयकाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारसमोर संख्याबळाचे मोठे आव्हान आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत एकूण सदस्यसंख्येच्या बहुमतासह उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोनतृतीयांश पाठिंबा आवश्यक आहे. सध्याच्या ५४३ सदस्यांच्या मंजूर संख्येनुसार हा आकडा ३६१ आहे. तीन जागा रिक्त असल्याने सभागृहात सध्या ५४० सदस्य आहेत. उपलब्ध वृत्तानुसार, एनडीएकडे ३२० खासदारांचे संख्याबळ असून आवश्यक घटनात्मक बहुमतासाठी विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासू शकते.

पालकमंत्र्यांचा दौरा ठरला; आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा!

त्यामुळे आगामी अधिवेशनात केवळ विधेयकांची चर्चा होणार की देशाच्या राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि विरोधकांची भूमिका या मुद्द्यांवर संसदेतील संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. आता सरकार अधिवेशनाची अधिकृत तारीख कधी जाहीर करते आणि महत्त्वाच्या विधेयकांसाठी आवश्यक संख्याबळ कसे जमवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!