व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

सुनेत्रा पवारांची दिलगिरी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “व्हॉट इज प्रॉब्लेम!”

Pune: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुण्याला कठोर पालकमंत्र्यांची गरज असल्याचे सांगताना सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याप्रमाणे काम करता येत नसल्याचे विधान रोहित पवार यांनी केले होते. या वक्तव्याचे पडसाद उमटताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले आहे.

रोहित पवार यांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी रोहितने वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असल्याचे स्पष्ट केले. एकदा माफी मागितल्यानंतर विषय संपायला हवा. रोहितने सॉरी म्हटल्याची माहिती कदाचित आंदोलन करणाऱ्यांपर्यंत पोहोचली नसेल, असेही त्या म्हणाल्या.

“आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. रोहितकडून अनावधानाने काही कमी- जास्त शब्द गेले असतील, तर त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी रोहितच्या वतीने हात जोडून माफी मागते. हे आमच्या पक्षाचे धोरण नाही,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

५४ मतांनी पराभूत झालेले परिसीमन विधेयक २२४ दिवसांनी पुन्हा संसदेत!

या प्रकरणावर अधिक स्पष्ट भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार या आपले मोठे बंधू अजित पवार यांच्या पत्नी असल्याची आठवण करून दिली. पवार कुटुंबात मिळालेल्या संस्कारांनुसार वयाने आणि पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करण्यात कोणताही कमीपणा वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले. “व्हॉट इज प्रॉब्लेम? विषय वाढवायचा असेल तर मला त्यात इंटरेस्ट नाही. मी त्यांच्या भावनांचा आदर करते. आणखी काही अपेक्षा असेल तर तेही करायला तयार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, परिसीमन विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबतही सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. संजय राऊत हे आपले मोठे बंधू असून महाराष्ट्र आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या.

संसदेच्या विशेष हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अद्याप अधिवेशनाचा अधिकृत अजेंडा जाहीर झालेला नसल्याचे स्पष्ट केले. अजेंडा समोर आलेला नसताना त्यावर भाष्य कसे करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत आपल्यावर टीका करतात असेही आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार?

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला असताना, दुसरीकडे कौटुंबिक संबंधांचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर अजित पवार गटाकडून आंदोलनाबाबत काय निर्णय घेतला जातो आणि दोन्ही गटांतील हा वाद शांत होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!