व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!

विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!

यवतमाळच्या भूमिगत गटार योजनेवरून सत्ताधारी नगरसेवकांचीच कोंडी;

Yavatmal : शहरातील महत्त्वाकांक्षी भूमिगत गटार योजनेवरून यवतमाळ नगरपरिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्बल १ हजार ८०० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचा आरोप होत आहे. कामाची गुणवत्ता, योजनेची उपयुक्तता आणि वाढत्या कर्जाच्या बोजावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे, ३ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष सभेत तिसऱ्या टप्प्यासाठी कर्ज घेण्याचा ठराव मंजूर होण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच सभा तहकूब करण्यात आली. या घडामोडीमुळे पक्षातील एका महत्त्वाकांक्षी नेत्याची नाराजी उघड झाली असून त्यांनी पक्ष कार्यालयातच नगरसेवकांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.

यवतमाळ शहरात सुमारे ७५० किलोमीटर खोदकाम करून भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी नगरपरिषदेला १५ टक्के आर्थिक हिस्सा उचलावा लागत असून त्यासाठी यापूर्वीही कर्ज घेण्यात आले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी जवळपास १७० कोटी रुपयांचे कर्ज सहा टक्के व्याजदराने घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही मलनिस्सारण व्यवस्था अपेक्षेप्रमाणे कार्यान्वित नसल्याने एवढा मोठा खर्च नेमका कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा

३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना योजनेच्या कामाबाबत जाब विचारला. कामाची गुणवत्ता, प्रत्यक्ष उपयोगिता आणि प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांची आवश्यकता यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यासाठी कर्ज मंजुरीचा ठराव पारित होणे कठीण असल्याचे चित्र निर्माण झाल्याने नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी विशेष सभा तहकूब केली.

सभेतील या घडामोडींमुळे योजनेसाठी आग्रही असलेल्या एका महत्त्वाकांक्षी नेत्याची नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते. निवडणुकीत तिकिटे देण्यापासून आर्थिक मदत करून निवडून आणण्यापर्यंत आपण प्रयत्न केले असताना, आपल्या विषयाला नगरसेवक विरोध कसा करू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

भूमिगत गटार योजनेचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना कितपत झाला, याबाबत यवतमाळकरांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. मलनिस्सारण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसताना आणि नगरपरिषदेची आर्थिक स्थिती कर्जाचा अतिरिक्त भार पेलण्यास सक्षम नसल्याची चिंता व्यक्त होत असताना आणखी कर्ज घेण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. त्यामुळे आगामी विशेष सभेत तिसऱ्या टप्प्यासाठी निधी उभारण्याच्या प्रस्तावाला नगरसेवक कितपत साथ देतात, की योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, याकडे लक्ष लागले आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली वाढणारा आर्थिक बोजा आणि योजनेच्या उपयुक्ततेचा प्रश्न यामुळे नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांसमोरच पेच निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!