मोदी सरकारची कसोटी, विरोधकांच्या एकजुटीत फूट पडणार?
New delhi : एप्रिल २०२६ मध्ये लोकसभेत आवश्यक बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलेले मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयक आता २२४ दिवसांनंतर पुन्हा संसदेच्या पटलावर येण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे, तर २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार असून हे विशेष कामकाज ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयक पुन्हा मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारची कसोटी लागणार आहे.
17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत संविधानाचे 131 वे सुधारणा विधेयक मतदानासाठी मांडण्यात आले होते. या विधेयकाच्या बाजूने 298, तर विरोधात 230 मते पडली. मात्र, घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोनतृतीयांश बहुमत मिळवण्यात सरकारला अपयश आले. आवश्यक 352 मतांच्या तुलनेत 54 मते कमी पडल्याने विधेयक फेटाळले गेले. आता पुन्हा हे विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदीय संख्याबळाची जुळवाजुळव महत्त्वाची ठरणार आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार?
प्रस्तावित विधेयकानुसार लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या 543 वरून कमाल 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या पुनर्रचनेत राज्यांना मिळणाऱ्या जागांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा पर्याय चर्चेत आहे.
एप्रिलमध्ये काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी लोकसंख्येच्या आधारे परिसीमन करण्यास विरोध केला होता. मात्र, आता विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयक आधी सभागृहात मांडू द्यावे आणि त्यातील सकारात्मक तरतुदींचा विचार करून राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, तामिळनाडूमधील द्रमुकने राज्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व सुरक्षित राहण्याची अट महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. राजदचे खासदार मनोज झा यांनी महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची रचना बदलण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर आक्षेप घेतला आहे.
उड्डाणपुलाचे काम रखडले; काँग्रेसने मशाल हाती घेतली, ‘अमरावती बंद’चा इशारा!
लोकसभेत घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळवणे हे सरकारसमोरील प्रमुख आव्हान आहे. प्रादेशिक पक्षांची भूमिका, संभाव्य पाठिंबा आणि विरोधकांमधील मतभेद यावर विधेयकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, अद्याप सरकारने विशेष कामकाजाचा अधिकृत अजेंडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदीय कामकाजात परिसीमनाचा मुद्दा प्रत्यक्षात किती पुढे जातो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.








