Lonar development plan will be discussed in Mumbai : पर्यटन महोत्सवाबाबत निर्णयाची शक्यता
Buldhana जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या विकास आराखड्यासह पर्यटन महोत्सव आयोजनाच्या मागणीसंदर्भात सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध प्रशासकीय अधिकारी तसेच माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत.
माजी आमदार संजय रायमुलकर यांनी २९ जानेवारी रोजी पर्यटनमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यात लोणार येथे महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन महोत्सव आयोजित करण्याची मागणी केली. तसेच लोणार विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्र्यांचे खासगी सचिव प्रल्हाद हिरामणी यांनी बैठकीचे आदेश निर्गमित केले आहेत.
MLA Shweta Mahale : ॲग्रीस्टॅकबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा!
ही बैठक मुंबईतील मंत्रालयातील दालन क्रमांक ३०२ येथे होणार आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, पर्यटन संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, बुलढाणा जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक (अमरावती), कला व सांस्कृतिक विभागाचे उपसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, उपसंचालक (नगर रचनाकार, अमरावती) आणि प्रादेशिक पर्यटन अधिकारी (अमरावती) हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
लोणार सरोवर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्याच्या विकासासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांचा आराखडा प्रस्तावित होता. माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने त्यात ६४ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ केली. त्यानंतर ४३४ कोटी ६२ लाख रुपयांचा अंतिम आराखडा मंजूर केला आहे. या बैठकीत या आराखड्याच्या अंमलबजावणीसह पर्यटन महोत्सवाच्या आयोजनावर सविस्तर चर्चा होणार आहे. या निर्णयामुळे लोणार सरोवराचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे.








