व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Dahihandi Festival : श्रद्धेची दहीहंडी झाली ‘इव्हेंट’; लाखोंचा खेळ सुरू, पण गोविंदांच्या...

Dahihandi Festival : श्रद्धेची दहीहंडी झाली ‘इव्हेंट’; लाखोंचा खेळ सुरू, पण गोविंदांच्या जीवाची जबाबदारी कोणाची?

dahihandi-festival-glamour-politics-money-govinda-safety-analysis : मनोऱ्यांचे थर वाढू द्या; पण सुरक्षेचे थर त्याहून अधिक वाढवण्याची स्पर्धा लावा

Nagpur : महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशे, डीजे, आकर्षक सजावट आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे वातावरण उत्साहाने भारले आहे. अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, सुनील शेट्टी, पद्मिनी कोल्हापुरे, गौतमी पाटील आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली आहे. राजकीय नेते आणि पदाधिकारीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.

दहीहंडी ही कृष्ण जन्माष्टमीशी जोडलेली श्रद्धेची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत तिचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसते. नऊ-दहा-अकरा थरांचे मनोरे, लाखो रुपयांची बक्षिसे, सेलिब्रिटी, जाहिराती, मोठे मंच आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती यामुळे धार्मिक उत्सवाचे रूप एका भव्य ‘इव्हेंट’मध्ये बदलत आहे. यात गैर काय? उत्सव मोठा होण्यात गैर नाही. प्रश्न आहे तो या झगमगाटाच्या केंद्रस्थानी असलेल्या गोविंदाच्या सुरक्षेचा.

Raju Jain : खासदार झाल्यानंतर राजू जैन आक्रमक; खासगी क्लासेसच्या विरोधात थोपटले दंड !

दरवर्षी दहीहंडीच्या वेळी मोठ्या संख्येने गोविंदा जखमी होतात. काहींना गंभीर दुखापती होतात, तर काहींच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम होतो. यंदाही सतरा वर्षांपूर्वी दहीहंडीच्या वेळी जखमी झालेला गोविंदा आजही बेड वर खिळून असल्याची कहाणी समोर आली. ही घटना केवळ भावनिक करणारी नाही; ती संपूर्ण उत्सव व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. विक्रमासाठी आणखी एक थर वाढवणे सोपे आहे; पण त्या थरावरून पडलेल्या गोविंदाचे आयुष्य पुन्हा उभे करणे शक्य आहे का?

Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे

आज दहीहंडीभोवती मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मंडप, जाहिराती, ध्वनिव्यवस्था, सजावट, सेलिब्रिटी आणि बक्षिसांवर लाखो रुपये खर्च होतात. राजकीय नेत्यांसाठी हा जनसंपर्काचा मोठा मंचही बनला आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वसामान्य गोविंदाला काय मिळते? प्रसिद्धी आणि आनंद नक्कीच; पण अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? दहीहंडी धार्मिक आहे म्हणून त्यावर प्रश्न विचारू नयेत, असे नाही. उलट श्रद्धा जपायची असेल तर माणसाचा जीवही जपला पाहिजे. उंच मनोरे उभारायचे असतील तर त्याचबरोबर प्रशिक्षित बचाव पथक, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा साधने आणि विमा संरक्षण यांचाही विचार झाला पाहिजे.

महाराष्ट्रात डीजेच्या आवाजावरून चर्चा आणि वाद सुरू असताना दहीहंडीतील वाढता ध्वनिप्रदूषण आणि गर्दीचे व्यवस्थापन याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दहीहंडी बंद करा, असा प्रश्न नाही. परंपरा थांबवण्याची गरजही नाही. मात्र ‘सर्वात उंच मनोरा’ करण्यापेक्षा ‘सर्वात सुरक्षित दहीहंडी’ करण्याची स्पर्धा सुरू झाली तर? मनोऱ्यांचे थर वाढू द्या; पण सुरक्षेचे थर त्याहून अधिक वाढले पाहिजेत. कारण दहीहंडीचा खरा जल्लोष तेव्हाच, जेव्हा हंडी फुटल्यानंतर प्रत्येक गोविंदा सुखरूप आपल्या कुटुंबात परततो.

__

error: Content is protected !!