व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Gondia Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सुलतानी कारभार!

Gondia Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सुलतानी कारभार!

District Central Bank administration controversy : कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा आरोप, निर्णयाविरोधात मोर्चा

Gondia जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुलतानी कारभाराविरोधात आज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आणि संस्थांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आणि सहकारी संस्थांचे मोठे नुकसान होणार असल्याने हा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शेअर्स त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यासाठी एक पत्र काढले आहे. या निर्णयामुळे संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तुट भरून काढावी लागेल. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे हा आदेश त्वरित रद्द करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

Lonar Panchayat Samiti : पंचायत समितीची आमसभा आहे, की आठवडी बाजार?

या मोर्चाचे नेतृत्व डोमा बोपचे, इंजिनिअर सुभाष आकरे, पंकज यादव, लखन मेंढे, यशवंत मानकर, खुमेश कटरे, धर्मेंद्र पटेल, योगेश हरिनखेडे यांनी केले. मोर्चा पोवार बोर्डिंग येथून सुरू होऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत बँक प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

फक्त शेअर संबंधित पत्र रद्द करण्याची मागणीच नाही, तर एकूण 12 मागण्या घेऊन संस्थांनी हे आंदोलन उभारले होते. त्यामध्ये संस्थांना पतपुरवठा सुलभ करणे, व्याजदर कमी करणे, शेतकऱ्यांना अधिक वित्तीय सुविधा उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संस्था चालकांना कोणताही त्रास होणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. आम्ही यावर सकारात्मक तोडगा काढू.”

Vidarbha Farmers : सोयाबीन घोटाळ्याचे पडसाद; सातबाऱ्याचा गैरवापर उघड

संघटनेचे पदाधिकारी सुभाष आकरे यांनी यावेळी सांगितले की, “आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला आणखी तीव्र आंदोलन उभारावे लागेल. शेतकऱ्यांचे हित कायम ठेवण्यासाठी आम्ही झुंज देत राहू.” बँक प्रशासन आणि संस्थांमध्ये हा वाद मिटतो की पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!