Bogus farmers registered in Goregaon purchase and sale unit : १.२० कोटींचा घोटाळा उघडकीस; शरद पवार गटाचा दावा
Gondia गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरेदी विक्री संघ गोरेगावच्या एका केंद्रावर तब्बल १५० हून अधिक बोगस शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येतो. मात्र, या केंद्रावर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही, अशांचीही नोंदणी करण्यात आली आहे. फक्त बोनस रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने ही बनावट नोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अंदाजे 1.20 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील आरोप पक्षाचे पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केला आहे.
या गैरव्यवहारामागे खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाचा हात आहे का? हे काम केवळ कर्मचारी स्तरावर झाले आहे का? याची चौकशी करण्याची मागणी मेश्राम यांनी केली आहे. एलआयडी LID प्रणालीच्या मदतीने केलेला हा घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्यात यावी. या घोटाळ्यात सामील असलेल्या जबाबदार व्यक्तींवर 420 चा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित संस्था त्वरित बंद करावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.