Women pushed the halfway stopped ST bus : भंडाऱ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
Bhandara महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्यात आली. महायुती सरकारने लागू केलेल्या योजनेमुळे महिला खुश झाल्या. पण भंडाऱ्यामध्ये अर्ध्या तिकीटात प्रवास करणाऱ्या महिलांनाच बंद पडलेल्या बसला धक्का देऊन पुढे न्यावे लागले. या घटनेची सध्या राज्यभर चर्चा होतेय.
भंडारा जिल्ह्यातील एका रस्त्यावर एसटी बस अचानक बंद पडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या बसला धक्का देणाऱ्या महिला प्रवाशांनी दाखवलेलं धैर्य आणि सामूहिकता यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेचा नेमका वेळ व बस कुठून कुठे जात होती, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडिओ भंडारा जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट होत आहे.
बस बंद पडताच महिलांनी स्वतः पुढाकार घेत, रस्त्यात अडकलेली एसटी ढकलून कडेला लावली. हा प्रसंग काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. ‘भाऊ नाही म्हणून काय झालं, आम्ही आहोत ना!’ या भावना व्यक्त करत महिलांनी एकत्र येऊन बसला धक्का दिला. काही पुरुष प्रवाशांनीही त्यांना साथ दिली.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असून, “हीच खरी महिला शक्ती”, “अशा बहिणींचा अभिमान वाटतो” अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. एसटी महामंडळाकडून या घटनेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र महिलांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान निश्चितच प्रेरणादायी आहे.








