70 people poisoned in wedding meal : तातडीने चौकशीचे आदेश; बालकांचाही समावेश
Gondia गोरेगाव तालुक्यातील बबई गावातील एका लग्नसोहळ्याचा आनंद काही तासांतच भयावह वेदनेत बदलला. केशोवराव बिसेन यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जेवणावळीतून तब्बल ७० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये ८ बालकांचा समावेश आहे. दोघा चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
लग्नसोहळा गुरुवारी (दि. ३ एप्रिल) पार पडला. त्यानंतर शुक्रवारी (दि. ४) परतीच्या वरातीसाठी बबई गावात वन्हाड्यांसह स्थानिकांना जेवण देण्यात आले. परंतु, शनिवारी सकाळपासूनच अनेकांनी उलटी, जुलाब, चक्कर येणे यासारख्या लक्षणांची तक्रार केली. यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होत गेली आणि अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.
२९ रुग्णांवर बबईच्या ग्रामीण रुग्णालयात तर चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आमगाव ग्रामीण रुग्णालयात ३ रुग्ण आणि गोंदिया येथील खासगी रुग्णालयात काही रुग्ण भरती आहेत. इतर खासगी रुग्णालयांमध्येही काही रुग्ण उपचार घेत आहेत.
Gondia administration : आमगावमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईवरून वाद!
शनिवारी रात्रीपासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. रविवारी मध्यरात्री काही रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने गोंदिया येथे हलविण्यात आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. यामध्ये २८ जणांची तपासणी करण्यात आली असून २६ रुग्णांना सौम्य विषबाधा झाल्याचे आढळले. उर्वरित दोघांवर कॅम्पमध्येच उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
Gondia ZP : गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी ‘गायब’, नागरिक वैतागले !
घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी चोपा व बबई येथील रुग्णालयांना भेट देत रुग्णांची विचारपूस केली. याशिवाय आमदार राजकुमार बडोले यांनीही कॅम्पला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे संपूर्ण बबई गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच रुग्णालयात दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ व काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Dr. Pankaj Bhoyar : लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची
या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून घाबरून जाऊ नका, असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी नागरिकांना केलं आहे.








