व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही

व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही

MLA’s son accused of assaulting a businessman in Akola : क्यूआर कोडद्वारे झालेल्या पेमेंटच्या वादातून घटना घडल्याची चर्चा; मध्यस्थीनंतर प्रकरण शांत

Akola अकोल्यातील संतोषी माता चौक परिसरात क्यूआर पेमेंटच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल न केल्याने कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. प्रकरणाची शहरातील राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे.

शहरातील संतोषी माता चौक परिसरात किरकोळ आर्थिक वादातून एका आमदाराच्या मुलाने व्यापाऱ्याला मारहाण केल्याची चर्चा बुधवारी शहरभर रंगली. मात्र, संबंधित व्यापाऱ्याने याप्रकरणी कोणतीही लेखी तक्रार दाखल न केल्याने रामदासपेठ पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.

High court : दिशाभूल करणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालय संतप्त; अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टीकरणाचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आमदाराच्या मुलाने एका कार्यकर्त्याला संतोषी माता चौकातील व्यापाऱ्याकडून पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स आणण्यासाठी पाठविले होते. कार्यकर्त्याने क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवल्याचे सांगितले. मात्र, व्यापाऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने व्यापाऱ्याने आमदाराच्या मुलाशी संपर्क साधून पैसे जमा करण्याची मागणी केली.

यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर आमदाराचा मुलगा संतोषी माता चौक परिसरात जाऊन व्यापाऱ्याशी शाब्दिक वाद घालत मारहाण केल्याची चर्चा आहे. या वेळी दोन ते तीन नगरसेवकही घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटविल्याचे सांगितले जाते. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याची माहिती आहे.

Vijay Wadettiwar : भाजप हुकुमशाहीचे समर्थक, त्यांना लोकशाही कधीच मान्य नव्हती

दरम्यान, व्यापाऱ्यावर दबाव आणल्यामुळेच तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांकडे तक्रार प्राप्त न झाल्याने कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते. या घटनेची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!