Uddhav Thackeray and Raj Thackeray reunite, set to stage a joint show of strength against the government : आंदोलन अराजनैतिक असेल, राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार नाही, दोघांनी केले स्पष्ट
Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात पेटलेला वणवा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या ज्वलंत मुद्द्यावर केंद्र सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मोठे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे येत्या रविवारी एकाच मंचावरून संयुक्त शक्ती प्रदर्शन करून केंद्र सरकारला आपली ताकद दाखवून देणार आहेत.
विशेष म्हणजे, हे आंदोलन पूर्णपणे अराजनैतिक असणार असून यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार नाही, तर केवळ देशाचा ‘तिरंगा’ झेंडा हातात घेतला जाईल. इतकेच नाही तर या आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही औपचारिक आवाहन करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही
केंद्र सरकारवर आणि न्यायव्यवस्था व्यवस्थेवर ताशेरे ओढताना या नेत्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज न्यायालयाला कुत्र्या-मांजराचे प्रश्न चटकन समजतात, मात्र विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालय दखल घेण्यास तयार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
भूतकाळातील घटनांची आठवण करून देताना जेव्हा भाजप विरोधात होती, तेव्हा ते उठसूठ आंदोलने करायचे आणि मंत्र्यांचे राजीनामे मागायचे. एका क्षुल्लक डॉयलॉगवरून आर. आर. पाटील यांना गृहखात्याच्या राजीनामा द्यावा लागला होता. मग आता नीट घोटाळ्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापलीकडे हे आंदोलन गेले आहे, तरीही राजीनामा का घेतला जात नाही. या सर्व पेपरफुटी प्रकरणात केंद्र सरकार पूर्णपणे दोषी असून, विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याची साधी तसदीही सरकारने घेतली नाही, असे सांगत भाजपला सत्तेचा माज आला आहे, असा घणाघात करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून ते मणिपूर जळत असताना दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, यापूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळेपर्यंत कोणीही मंत्री भेटायला गेले नाही, मणिपूर जळत असताना एकही मंत्री तिकडे फिरकला नाही आणि आता दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही.
केवळ ट्विट करून पंतप्रधान आपली नैतिक जबाबदारी झटकत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला, इतकेच नव्हे तर पोलिसांच्या वेशात अंगावर नावाची पाटी नसलेले गुंड पाठवले गेले, हे गुंड नेमके कोणी पाठवले याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, जर महाराष्ट्रात किंवा दिल्लीतील या आंदोलनामध्ये सत्ताधाऱ्यांनी कसल्याही प्रकारची हुल्लडबाजी केली किंवा गुंड धाडण्याचा प्रयत्न केला, तर त्या हुल्लडबाजांना आणि गुंडांना आम्ही रस्त्यावर उतरून फोडून काढू, असा सज्जड इशारा राज राज ठाकरे यांनी यावेळी दिला.








