Schoolgirls fly for the first time : अनुसूचित जाती-नवबौद्ध शाळेच्या ४० विद्यार्थिनींची पहिली हवाई सफर
Bhandara आकाशात उडणारं विमान बघणे हा खेड्यापाड्यातील मुला-मुलींसाठी फक्त एक खेळ आहे. आपण विमान बघितलं, याचाच त्यांना खूप आनंद असतो. अशात आपण कधीतरी विमानप्रवास करणार, अशी कल्पनाही ही मुलं करू शकत नाहीत. अशात भंडारा जिल्ह्यातील ४० शाळकरी मुलींनी पहिल्यांदा विमानप्रवास केला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. आपल्याला हवाई सफर घडेल, असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता, अशी उत्स्फूर्त भावना त्यांनी व्यक्त केली.
समाज कल्याण विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींसाठी सरकारी निवासी शाळा, राजेठठीगाव येथील ४० विद्यार्थिनींना आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देण्यात आला. शिक्षणासोबतच विज्ञान व तंत्रज्ञानाची झलक मिळावी, आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, या हेतूने या विद्यार्थिनींना विमान प्रवास आणि इस्रो भेटीचा अविस्मरणीय प्रवास घडवण्यात आला.
CM Devendra Fadnavis : प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग संशोधन केंद्र!
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून रवाना होण्याआधी विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी संदेश कोळेकर व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही स्वप्नं मोठी बघा, शिक्षणाच्या माध्यमातून त्या पूर्ण करा’ असा संदेश देत त्यांनी मुलींचं मनोबल उंचावलं. या उपक्रमात सहभागी झालेल्या बहुतेक मुली पहिल्यांदाच विमानात बसणार होत्या. त्यामुळे उत्साह, कुतूहल आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
या विमान प्रवासाद्वारे मुलींना गोवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ISRO च्या विज्ञान प्रकल्पांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. शालेय पातळीवर विज्ञानाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये केवळ ज्ञानवृद्धीच नव्हे तर आत्मविश्वास, सक्षमीकरण आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक प्रेरणा मिळेल, असा विश्वास आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला.
“शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांनाही उत्तम संधी मिळायला हव्यात. अशा उपक्रमांमुळे त्या संधी अधिक जवळ येतात,” असं त्यांनी सांगितलं. या संधीमुळे भारावलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “आमच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम दिवस आहे. आम्हाला आजवर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की विमानात बसण्याचा अनुभव मिळेल.” काही विद्यार्थिनींनी यामुळे भविष्यात विज्ञान, अंतराळ संशोधन व अभियंता बनण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.