Breaking

Amravati BJP : अंजनगावात भाजप अध्यक्ष निवडणूक गदारोळात

BJP President election in dispute in Anjangaon : शहर मंडळ अध्यक्षाची निवड; ग्रामीण अध्यक्ष निवडणूक तूर्तास रद्द

Amravati अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पक्षाच्या अंजनगाव शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवारी शासकीय विश्रामगृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अचानक निवडणुकीची घोषणा आणि जागेचे योग्य नियोजन नसल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरीची वेळ आली. परिणामी, ग्रामीण मंडळ अध्यक्षाची निवडणूक तूर्तास रद्द करण्यात आली असून, शहर मंडळ अध्यक्षाची निवड गोंधळातच पार पडली.

या निवडणुकीसाठी मंगळवारी दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. शहर आणि ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागील तीन महिन्यांत पक्षाने सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. त्यामधून सक्रिय सदस्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्याच माध्यमातून अध्यक्षपदाची निवड होणार होती.

Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

तथापि, मंडळ अध्यक्षपदासाठी ४५ वर्षांची वयोमर्यादा घालण्यात आली होती. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना यामुळे नाराजी होती. त्यातच, निवडणुकीच्या जागेचे योग्य नियोजन न करता अचानक प्रक्रिया सुरू केल्याने वातावरण तापले. अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यामुळे गोंधळ वाढत गेला.

या गोंधळातच अंजनगाव शहर मंडळ अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब वानखडे यांनी जबाबदारी पार पाडली. दुसरीकडे, ग्रामीण अध्यक्षपदासाठी सिद्धार्थ वानखेडे निवडणूक अधिकारी होते, मात्र वाढत्या गोंधळामुळे त्यांनी प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत गांभीर्य न बाळगल्याबद्दल काही पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण मंडळ अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पुढील काळात कधी घेतली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.