व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Adivasi Pardhi Family : आदिवासी पारधी कुटुंबावर सावकाराचा हल्ला, महिला गंभीर !

Adivasi Pardhi Family : आदिवासी पारधी कुटुंबावर सावकाराचा हल्ला, महिला गंभीर !

Moneylender Exploits Illiteracy, Grabs Land Under Guise of Mortgage : अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत गहाणपत्राच्या नावाखाली हडपली जमीन

Beed : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केवड गावात आदिवासी पारधी समाजातील शांतिनाथ उत्तम काळे आणि त्यांच्या कुटुंबावर सावकार सुग्रीव सपाटे याने वडिलोपार्जित जमीन बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावकाराने २०-२५ जणांचा जमाव घेऊन कुटुंबावर हल्ला केला. यात शांतिनाथ यांच्या पत्नी छायाबाई काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना केवड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांना आंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले आहे.

शांतिनाथ आणि दीपक काळे हे भाऊ केवड गावात वडिलोपार्जित जमिनीवर राहत होते. दीपक यांच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याने उपचारासाठी सावकार सुग्रीव सपाटे याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये उसनवारीवर त्यांनी घेतले. अशिक्षित कुटुंबाचा गैरफायदा घेत सावकाराने गहाणपत्राच्या नावाखाली जमिनीची बेकायदेशीर रजिस्ट्री केली. त्यानंतर पोलिस संरक्षण आणि तहसीलदारामार्फत अतिक्रमण हटवण्याची मागणी करून कुटुंबाचे घर पाडले, ज्यामुळे ते बेघर झाले.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना दिलासा !

बेघर झालेल्या कुटुंबाने नागपूर येथील पारधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांना ही बाब सांगितली. पवार यांनी कुटुंबाला मुख्यमंत्री सचिवालयातील उपसचिव आशा पठाण यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारीनंतर पठाण यांनी बीड जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना तात्काळ पत्र पाठवले. पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले, त्यावर त्यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना कारवाईचे आदेश दिले. राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडेही तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांनी दिली.

Changes in GST : जीएसटीत बदलामुळे जनतेला दिलासा, पण…

पवार यांनी पीडित काळे कुटुंबाला बीड येथे घरी परतण्याचा सल्ला देत पीडित इंदुबाई दीपक काळे यांच्या मार्फत बीड पोलिस अधीक्षकांना संरक्षणासाठी पत्र सादर केले. तसेच, महाराष्ट्र अनुसूचित जमाती जमीन प्रत्यर्पण अधिनियम, १९७४ अंतर्गत जमीन परत मिळवण्याची विनंती तहसीलदारांना केली. त्यावर सुनावणी ठरवण्यात आली. मात्र, सुनावणीचे पत्र मिळताच सावकाराने २०-२५ जणांचा जमाव घेऊन काळे कुटुंबावर हल्ला केला. यात छायाबाई यांना गंभीर दुखापत झाली, तसेच शांतिनाथ उत्तम काळे या पीडित आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

पीडित कुटुंबाने केज पोलिसांकडे धाव घेतली आणि सावकार व गावगुंडांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बीड पोलिसांनी कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!