NCP Brings Together Unorganized Labor and Minorities : महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
Nagpur : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी हालचाली वाढल्या आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. शहरात असंघटीत कामगार आणि अल्पसंख्याक समाजाची मोट बांधण्यात आली आहे. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाकडे लक्ष केंद्रित केल्याचे यातून दिसून येते.
पक्षातर्फे नागपुरात नुकतीच असंघटीत कामगार आणि अल्पसंख्याक विभागाची कार्यकारीणी तयार करण्यात आली. त्यासाठी पक्षाने स्वतंत्र मेळावा घेतला. या मेळाव्याला पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन प्रामुख्याने आले होते. याच मेळाव्यात इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी काही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर नागपूरचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर आणि निरीक्षक राजेंद्र जैन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
असंघटीत कामगार आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन करत राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला. सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे काम वाढवण्याचे आवाहन नवनियुक्त शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी कार्यकर्त्यांना केले. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी शहरात पक्ष अधिक मजबूत होईल, अशी ग्वाही अहीरकर यांनी यावेळी दिली.
या मेळाव्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. हा मेळावा शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवरकर यांच्या पुढाकाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुनीता येरणे, लाला चौबे, विशाल खांडेकर, प्रशांत पवार, तानाजी वनवे, हाजी सोहेल पटेल. बजरंगसिंग परिहार, दिलीप पनकुले, जानबा मस्के, मुनाफ बंदुकिया, मेहबूब पठाण, मुमताज बाजी, कल्ला नायक, राकेश घोसीकर, विवेक वानखेडे आदी उपस्थित होते.








