Akola Municipal Corporation : शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपला साथ देणार?

Sharad Pawar’s NCP may extend support to the BJP : अकोला महापालिकेतील सत्तास्थापनेच्या राजकारणात मोठी उलथापालथ

Akola अकोला महापालिकेतील सत्तास्थापनेच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक उलथापालथ घडून आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणे एका झटक्यात बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका, हालचाली आणि दावे–प्रतिदावे यांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप तसेच विरोधी गटांकडून अपक्ष आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

BMC Power Tussle : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत तणाव; सत्तेसाठी ‘नाशिक’ पॅटर्नची चर्चा!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून पाठिंब्याबाबत दिल्या जाणाऱ्या भूमिकेनुसार, प्रभागातील नागरिकांना निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. सत्तेत सहभागी झाल्यास नागरिकांची कामे मार्गी लावणे अधिक सोयीचे ठरेल. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास तसेच महापालिकेतील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी स्थिर सत्ता आवश्यक असल्याचे मत या निर्णयामागे मांडले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या या भूमिकेमुळे महापालिकेतील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, येत्या काही दिवसांत सत्तास्थापनेची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संभाव्य पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ भक्कम झाले असून, सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे, विरोधी गटात अस्वस्थता पसरली असून अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

zero vote : “घरच्यांची मतं जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत कुठे गेलं?”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे महानगर अध्यक्ष रफिक सिद्धिकी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “नागरिकांच्या कामासाठी आम्ही निवडून आलो आहोत. त्यांची कामे व्हावीत हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्ष जो आदेश देईल, त्या निर्णयासोबत आम्ही बांधील राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. काही नगरसेवकांची भूमिका पुढील काळात अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, अकोल्याच्या राजकारणात आणखी हालचाली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उलथापालथीमुळे आगामी काळात कोणते नवे राजकीय भूकंप घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.