Teacher among those who forwarded videos related to the sexual exploitation case : मोबाइल विसरल्याने उघड झाले ‘व्हिडिओ कांड’; ‘स्नॅपचॅट’वर होते व्हिडिओ
Amravati परतवाडा शहरातील अयान अहमद प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले असून, पोलिस तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. काही मुलींशी शारीरिक जवळीक साधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अयान अहमद आणि उजेरखान इकबाल खान हे मित्र होते. सुमारे महिनाभरापूर्वी अयान आपला मोबाइल एका पानटपरीवर विसरला होता. मोबाइलचा पासकोड माहिती असल्याने उजेरने तो उघडून त्यातील स्नॅपचॅट अॅप तपासले. त्यामध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने त्याने ते स्वतःच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतले.
यानंतर उजेरने हे व्हिडिओ मोहम्मद साद आणि एहफाज खान यांना पाठवले. या फॉरवर्डमुळे प्रकरण उघडकीस आले. अयान हा विविध ठिकाणी मुलींना घेऊन जाऊन शारीरिक संबंधांचे चित्रीकरण करत असल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात एका खासगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाचाही सहभाग समोर आला आहे. एहफाज खान याने संबंधित व्हिडिओ पाहून ते इम्रान आणि नावेद यांना पुढे पाठवले. अशा प्रकारे फॉरवर्डची साखळी तयार झाली असून, आतापर्यंत सहा जणांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. दुसऱ्या साखळीत उजेरने हे व्हिडिओ मोहम्मद साद आणि तबरेज खान यांनाही पाठवले होते.
कठोरा नाका परिसरातील एका तरुणाने आपला भाड्याचा फ्लॅट तासिका तत्त्वावर उपलब्ध करून दिल्याची बाबही समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारे फ्लॅटचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेक मोबाइल जप्त केले असून, तपासाचा विस्तार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित फ्लॅटमध्ये पूर्वी राहणाऱ्या पीयूष नामक तरुणानेच हा प्रकार सुरू करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित तरुणाने तासिका पद्धतीने फ्लॅट उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. अयान अहमद याचा या माध्यमातून फ्लॅटधारकाशी संपर्क आला होता. या संपूर्ण प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग उघड होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पोलिस तपास सुरू आहे.






