dr-anand-nadkarni-passes-away-renowned-psychiatrist-writer-mental-health : मनाच्या जखमांना शब्द देणारा आवाज हरपला
Mumbai: मानवी मनातील गुंतागुंत, मानसिक आरोग्याचे सूक्ष्म पैलू आणि मनोविकारांविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आयुष्यभर झटणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्र, साहित्यविश्व आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
मानसिक आजार हा लपवण्याचा किंवा घाबरण्याचा विषय नसून तो इतर शारीरिक आजारांप्रमाणेच एक सामान्य आरोग्यविषयक समस्या आहे, हा विचार समाजात रुजवण्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी मानसिक आरोग्याबद्दलचे लेखन अत्यंत सहज, सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा शैलीत केले. त्यांच्या पुस्तकांनी आणि व्याख्यानांनी अनेकांना मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलण्याची प्रेरणा दिली.
डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मनोविकारतज्ज्ञ नव्हते, तर ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य, नाटक, सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशन या क्षेत्रांमध्येही ठसा उमटवला. १९८० साली त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली, तर १९८४ मध्ये मनोविकारशास्त्र विषयात एमडी पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच समाजात मनोविकारांविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी स्वतंत्र चळवळ उभी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता.
Neet paper leak : टेलिग्रामवर लाखोंमध्ये प्रश्नपत्रिका विक्री, सीबीआय तपासात देशव्यापी रॅकेट उघड !
याच विचारातून २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात ‘आयपीएच’ अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था केवळ मानसिक आजारांवरील उपचारांपुरती मर्यादित न राहता मानसिक आरोग्य जनजागृती, समुपदेशन, कुटुंब सहाय्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजप्रबोधनासाठीही कार्यरत राहिली. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला आणि संवाद या माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न त्यांनी केला.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्रासह विविध सामाजिक आणि वैचारिक विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘एका सायकिअॅट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘मुक्तिपत्रे’, ‘मनोविकास’, ‘देवराईच्या सावलीत’ आणि ‘हेही दिवस जातील!’ यांसारखी त्यांची पुस्तके विशेष गाजली.
रंगभूमीवरही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘आम्ही जगतो बेफाम’ आणि ‘जन्मरहस्य’ ही त्यांची नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला होता, तर ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. ‘गेट वेल सून’ या नाटकासाठी त्यांनी कथा संकल्पना दिली होती आणि त्या नाटकाची त्या वर्षातील उत्कृष्ट नाटकांमध्ये निवड झाली होती.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रातील संवेदनशील आणि अभ्यासू आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मानसिक आरोग्याविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.








