Shashikant Shindes appeal regarding houses of Mathadi workers : माथाडी कामगारांच्या घराबाबत शशिकांत शिंदेंची आर्त हाक
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक आवाहन केले. माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली. “देवाभाऊ भावनिक आहेत, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता. आमचे प्रश्न फारसे नाहीत, पण कामगारांना न्याय द्या,” असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या वारशाचा दाखला देत माथाडी कामगारांच्या एकजुटीवर भर दिला. “राज्यात माथाडी कामगार आणणारे अण्णासाहेब हेच आमच्यासाठी देव आहेत. बाकीचे केवळ फोटो लावतात. संकट काळात माथाडी कामगार नेहमी राज्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटातही माथाडी कामगार एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत,” अशी घोषणा त्यांनी केली.
माथाडी कामगारांच्या घरांच्या संदर्भात बोलताना त्यांनी वडाळा आणि कांजूर प्रकल्पांसह सिडकोच्या घरांच्या किंमतींवर प्रश्न उपस्थित केला. “सिडकोच्या घरांच्या किमती खाजगी बिल्डरपेक्षा जास्त आहेत. मार्केटजवळ कामगार राहत असतील तर त्यांना दिलासा मिळेल. या निकषांवर विचार करून निर्णय घ्यावा,” अशी मागणी शिंदे यांनी केली.
Parliamentary Debate : संवाद नाही, संसदीय चर्चेच्या अभावावर खंत !
त्यांनी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबतही चिंता व्यक्त केली. “अण्णासाहेबांनी केलेला कायदा जिवंत राहावा, हीच आमची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्व मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आधार दिला. आजही तेच अपेक्षित आहे. बाजार समितीत आमचे अधिकार कायम ठेवावेत, बाहेरच्या लोकांना अन्याय करण्याची संधी देऊ नका,” असे शिंदे म्हणाले.
Vidarbha Farmers : आठ महिन्यांत १४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
मुख्यमंत्री फडणवीसांकडे अपेक्षा व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “तुमचे मन हळवे आहे, माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न निकाली काढा. आजचा कार्यक्रम आश्वासनांचा न राहता पूर्ततेचा ठरावा. सरकार म्हणून बळीराजाच्या मदतीला उभे राहिलो, याचे समाधान मिळाले पाहिजे.”
____