Sharad Pawars comment on challenges facing Constitution and parliamentary democracy : संविधान, संसदीय लोकशाहीपुढील आव्हानांवर शरद पवारांचे भाष्य
Pune : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधान, संसदीय लोकशाही आणि त्यापुढील आव्हानांवर महत्त्वपूर्ण विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावही उपस्थित होते.
पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर सविस्तर भाष्य करताना सांगितले की, “भारत आज शेजारील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका याठिकाणी राजकीय अस्थिरता आहे, मात्र भारत एकसंघ आहे. या स्थैर्याचे 100 टक्के श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जाते.”
Vidarbha Farmers : आठ महिन्यांत १४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
त्यांनी संसदीय चर्चेच्या अभावावरही खंत व्यक्त केली. “संसदेची नवी वास्तू उभारण्याचा निर्णय असो किंवा इतर अनेक निर्णय, चर्चा आणि संवाद टाळले जातात. आजच्या सत्ताधाऱ्यांना लोकशाही पद्धती जतन करण्याबाबतची जबाबदारी आहे, पण त्यातून मुक्त झालो आहोत, असा विचार दिसतो,” अशी टीका शरद पवारांनी केली.
भाक्रा नांगल धरणासह जलविद्युत प्रकल्पांची योजना डॉ. आंबेडकरांच्या काळातच आकारास आली होती, याची आठवण करून देत पवार म्हणाले की, “शेती समृद्ध व्हावी, भुकेचा प्रश्न सुटावा यासाठी आंबेडकरांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे होते. संविधानाबरोबरच देश उभा करण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य आपण कधीच विसरू शकत नाही.”
Uddhav Balasaheb Thackeray : कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात तूर, सोयाबीनच्या पेंढ्या फेकल्या
कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या लिखाणाच्या प्रकाशनाविषयीही उल्लेख केला. “मी राज्याची सूत्रे हाताळत असताना बाबासाहेबांच्या लेखनाचे 9 ग्रंथ प्रसिद्ध केले. महात्मा फुले यांच्या लिखाणाचे प्रकाशनही सुरू केले. मात्र आजच्या सरकारच्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये फुले-आंबेडकरांचे लिखाण दुर्मिळ दिसते, त्याऐवजी इतर विचारप्रवाहाचे ग्रंथ पुढे केले जातात. त्यामुळे वास्तवावर आधारित लिखाण कितपत जनतेसमोर आणले जाते, हा प्रश्न राहतो,” असे शरद पवार म्हणाले.
शेवटी त्यांनी सोशल रिसर्च सेंटर नव्या पिढीला विचारप्रवृत्त करणारे व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली दिशा, त्यांची विचारसरणी आणि आजच्या आव्हानांचा विचार यातून नवे मार्ग सापडतील,” असे पवारांनी नमूद केले.
____








