व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अर्ज भरायला वेळ लागत नाही, कागदपत्रे...

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अर्ज भरायला वेळ लागत नाही, कागदपत्रे घेऊनच फिरतो’

Bacchu kadu likely to accept Eknath Shinde Shivsena offer : शिवसेनेची ऑफर स्वीकारल्याचे स्पष्ट संकेत, उदय सामंतांनी संपर्क साधल्याचेही सांगितले

Nagpur राजकीय वर्तुळात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिळालेली ऑफर स्वीकारण्याचे स्पष्ट संकेत खुद्द कडू यांनीच दिले आहेत. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज भरायला फारसा वेळ लागत नाही, मी कागदपत्रे बॅगेत घेऊनच फिरतो, असे सांगून त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत घेऊन कडू यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या ऑफरला दुजोरा दिला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात आपल्याशी संपर्क साधल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, रक्ताचे पाणी करून उभी केलेली ‘प्रहार’ संघटना अचानक विलीन करण्याबाबत त्यांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. प्रहार ही संघटना मोठ्या मेहनतीने उभी राहिली आहे, ती एकाएकी विलीन करता येणार नाही.

Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी शिवसेनेत सस्पेन्स, एक नाव निश्चित, दुसऱ्या उमेदवारीवर अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच

काही तांत्रिक गोष्टी चर्चेने सुटू शकतात, त्यावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेऊ, असे कडू यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघ्या एक दिवसाचा अवधी शिल्लक आहे, अशा स्थितीत कडू यांनी कागदपत्रे सोबत असल्याचे सांगणे, हे त्यांनी निवडणुकीची पुरेपूर तयारी केल्याचे निदर्शक मानले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू, एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी त्यांच्यासोबत बाहेर पडले होते. मात्र, महायुती सरकार आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही, ज्यामुळे ते काही काळ नाराज असल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीपासून दूर जात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र तिथे त्यांच्यासह ‘प्रहार’च्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला.

Legislative Elections : ना जोशी, ना तिवारी; थेट भेंडेवर बाजी; विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘सहकार’ धोरण!

या पराभवानंतर बच्चू कडू यांच्यातील आंदोलक पुन्हा जागा झाला आणि त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरच्या वर्धा रोडवर चार दिवस मोठे आंदोलन करून सरकारला नमवले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीही सुरू केली होती, मात्र आता थेट विधान परिषदेची ऑफर मिळाल्याने कडू यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!