व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘संपूर्ण आयोग बरखास्त करा’; सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर;

‘संपूर्ण आयोग बरखास्त करा’; सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर;

MPSC वादात संजय गायकवाडांचे विधान; २०१८ पासूनच्या प्रकरणांची चौकशी करण्याचीही मागणी

Buldhana महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत असतानाच, सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. MPSCच्या संपूर्ण मंडळाची चौकशी करून ते बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र आणि आपल्याकडील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

MPSCच्या परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत असतानाच आता सत्ताधारी आमदार गायकवाड यांनी आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अनिल सोले बंडाच्या तयारीत; सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

‘संपूर्ण MPSC मंडळ बरखास्त करा’

पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड यांनी MPSCच्या कामकाजाबाबत अनेक गंभीर आरोप केले. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तपासणीपासून भरती प्रक्रियेपर्यंत विविध टप्प्यांवर गैरप्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे केवळ एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घेण्याऐवजी संपूर्ण आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मंडळच बरखास्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यातील अनेक विद्यार्थी आणि संघटनांकडून MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचा उल्लेखही गायकवाड यांनी केला. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती केवळ अध्यक्षांच्या राजीन्यापुरती मर्यादित ठेवता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘२०१८ पासूनच्या प्रकरणांची चौकशी करा’

MPSCच्या कामकाजाबाबत २०१८ पासून अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. छत्रपती संभाजीनगरशी संबंधित काही व्यक्तींची नावे आणि माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींच्या मालमत्तेत झालेल्या कथित वाढीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

फडणविसांच्या मनाप्रमाणेच झाले, भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या नावावर मोहर

आयोगाशी संबंधित व्यक्तींच्या संपत्तीचीही तपासणी झाली पाहिजे. त्यांच्या मालमत्तेत एवढी वाढ कशी झाली, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करावा, असे गायकवाड म्हणाले. यासाठी आपल्याकडे असलेली कागदपत्रे आणि पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पैसे घेऊन कोणाला पास केले, याचीही चौकशी करा’

परीक्षांमध्ये पैसे घेऊन उमेदवारांना पास केले गेले का, याचीही चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर यश मिळायला हवे. मात्र, पात्र उमेदवारांना डावलून ओळखीच्या किंवा मर्जीतील व्यक्तींना संधी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आयोगाच्या विविध समित्यांवर काम करणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही एका सरकारच्या काळातील प्रकरण म्हणून या मुद्द्याकडे न पाहता, यापूर्वीच्या काळात गैरप्रकार झाले असतील तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांकडे पुरावे देणार

या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे पत्र आणि काही पुरावे असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. हे पत्र आणि पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!