गडचिरोलीत रस्ता बॅरिकेट्स आणि काठ्यांनी बंद केल्याने संताप
Gadchiroli : सुरक्षेच्या नावाखाली चंद्रपूर मार्गावरील वळणमार्ग बॅरिकेट्स आणि बांबूच्या काठ्यांनी बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते सव्वा किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने ‘ही रस्ता सुरक्षा की नागरिकांना शिक्षा?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासमोरच नागरिकांनी पोलिसांच्या या वाहतूक व्यवस्थेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल, तर अशा उपाययोजनांचा फेरविचार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका नागरिकांनी मांडली. यावेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही नागरिकांची गैरसोय होईल, अशा पद्धतीने उपाययोजना करू नयेत, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
शहरातील चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून दुभाजकावरील काही वळणमार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी वाहतूक रोखण्यासाठी बांबूच्या काठ्यांचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना लांबचा फेरा मारावा लागत आहे.
या व्यवस्थेचा सर्वाधिक त्रास गणेशनगर, पंचवटीनगर, बजरंगनगर, अयोध्यानगर आणि झाशीची राणी नगर परिसरातील रहिवाशांना होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि रोजच्या कामानिमित्त या मार्गाचा वापर करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका! एमपीएससी सचिवांची बदली; अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम!
दरम्यान, आशिष जयस्वाल या मार्गावरून जात असताना त्यांना मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसली. दोनशेहून अधिक नागरिक जमल्याचे लक्षात येताच त्यांनी आपला ताफा थांबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांनी पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण आणणे आवश्यक असले, तरी त्यासाठी नागरिकांची दैनंदिन गैरसोय होईल, अशी व्यवस्था योग्य ठरू शकत नाही. वळणमार्ग पूर्णपणे बंद करण्याऐवजी सुरक्षित आणि नागरिकांना सहज वापरता येईल, अशा पर्यायी व्यवस्थेची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, वाहतूक शाखेत मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करूनही अपघातांचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी झाले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अपघात रोखण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, याचा आढावा घेण्याची मागणीही पुढे येत आहे.
‘जखम पायाला आणि मलम डोक्याला’ अशा स्वरूपाचे नियोजन करून नागरिकांची गैरसोय वाढवू नये, अशी भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. आता प्रशासन या समस्येवर कोणता कायमस्वरूपी आणि सुरक्षित तोडगा काढते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








