ganeshotsav-dj-ban-sandeep-joshi-aggressive-nagpur-bjp-internal-opposition : गणेशोत्सवातील डीजे, लेझर लाईट्सच्या वापरावरून वाद पेटला
Nagpur : महाराष्ट्रत्सवातील डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून वाद चांगलाच पेटला असताना नागपूर भाजपमधील अंतर्गत मतभेदही उघड झाले आहेत. माजी महापौर व भाजप नेते संदीप जोशी यांनी स्वपक्षीय नेत्यांचा विरोध झुगारून नागपुरात डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे.
संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत डीजेबंदीची मागणी केली. त्यानंतर शुक्रवारी ते महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन नागपुरात डीजेच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत निवेदन देणार आहेत. या भूमिकेमुळे नागपूर भाजपमधील मतभेद अधिक ठळक झाले आहेत. जोशी डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यांचा दाखला देत बंदीच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, भाजप आमदार प्रवीण दटके आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. केवळ हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरण आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा का उपस्थित केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
DJ ban : डीजे हवा की आरोग्य? कान-डोळे उध्वस्त करण्याचा अट्टहास नेमका कुणासाठी?
दरम्यान, पुण्यात डीजेबंदीची मागणी करणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला. भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनी या वादात न पडता पुणेकरांवर निर्णय सोपवावा, अशी भूमिका घेतल्याचे समोर आले होते. त्याचवेळी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात डीजे आणि डोळ्यांना इजा पोहोचवू शकणाऱ्या लेझर लाईट्सच्या वापरावर १ नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नागपुरातील डीजेचा मुद्दा आता अधिकच संवेदनशील बनला आहे.
Manoj Jarange : उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार, ११ सप्टेंबरची डेडलाईन
एकीकडे स्वपक्षीय आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध, तर दुसरीकडे डीजेबंदीबाबत प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका असताना संदीप जोशी यांनी कायमस्वरूपी बंदीसाठी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेवर नागपूर भाजपमध्ये पुढे काय पडसाद उमटतात, याकडे आता लक्ष लागले आहे.








