iran-us-conflict-hormuz-strait-tension-iran-attack-10-ships : आखातात तणाव वाढला, प्रतिबंधित आणि असुरक्षित सागरी क्षेत्रातून जाण्याऱ्या जहाजांवर कारवाई
Tehran : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता होर्मुझ सामुद्रधुनीपर्यंत पोहोचल्याने आखाती क्षेत्रातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने पाच इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) प्रत्युत्तरादाखल एका दिवसात १० जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामध्ये दोन अमेरिकी नौदल विनाशिका आणि आठ तेलवाहू जहाजांचा समावेश असल्याचे इराणने म्हटले आहे. या दाव्यांची मात्र स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील प्रतिबंधित आणि असुरक्षित सागरी क्षेत्रातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्यात आली. तसेच कुवेत, जॉर्डन आणि बहरीनमधील काही बंदरे व नांगरस्थळी असलेल्या जहाजांच्या कर्मचाऱ्यांना जहाजे रिकामी करण्याचा इशारा देण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकी लष्करी उपस्थिती असलेल्या किंवा अमेरिकी कारवायांना सहकार्य करणाऱ्या ठिकाणांवरील जहाजांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडने पाच इराणी कच्च्या तेलाच्या वाहतूक करणाऱ्या जहाजांवर कारवाई केल्याची माहिती दिली. एम/टी काविझ, एम/टी चार्मिनार, एम/टी होरायझन-१ आणि एम/टी रिस्को या जहाजांना ओमानच्या आखातात, तर एम/टी दर्या या जहाजाला खार्ग बेटाजवळ लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले.
अमेरिकेच्या दाव्यानुसार, आयआरजीसीने एका अमेरिकी नौदल युद्धनौकेवर दोन वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही हल्ले निष्फळ ठरले. याउलट, इराणने डीडीजी-११९ आणि डीडीजी-५३ या दोन अमेरिकी विनाशिकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. या दाव्यांचीही स्वतंत्र पडताळणी झालेली नाही. इराणने अमेरिकी पाण्याखालील ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावाही केला. पेंटागॉनने तो फेटाळून लावत संबंधित ड्रोन आधीच बंद पडल्याचे म्हटले आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलिसांना ३०.५२ कोटींचे बळ !
होर्मुझ सामुद्रधुनीत संघर्ष वाढल्यास जगाच्या तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीपासून जागतिक ऊर्जा बाजारापर्यंत त्याचे पडसाद उमटू शकतात. आखातातील पुढील हालचालींवर आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.








