ladki-bahin-yojana-80-lakh-women-ineligible-ekyc-benefit-stopped-maharashtra : ई-केवायसी न केल्याने अपात्र, लाडकी बहीण योजनेला मोठा झटका
Mumbai : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या तसेच पडताळणीत अपात्र ठरलेल्या तब्बल 80 लाख महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात जमा होणारी दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत बंद होणार आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते. महायुती सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी ही एक योजना मानली जाते.
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज केले होते. त्यावेळी लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 46 लाख इतकी होती. मात्र, त्यानंतर शासनाने लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू केली. यामध्ये उत्पन्नाची अट, सरकारी नोकरी, इतर शासकीय लाभ तसेच पात्रतेचे विविध निकष तपासण्यात आले.
या छाननीदरम्यान अनेक अपात्र लाभार्थी समोर आले. काही सरकारी कर्मचारी, आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला तसेच नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना योजनेतून वगळण्यात आले. यानंतर शासनाने लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि पात्र महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती.
Sting operation : खळबळजनक… केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष दाखवत २० कोटींची मागणी!
सरकारने ई-केवायसीसाठी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात आली. सुरुवातीला निश्चित केलेल्या मुदतीनंतर 31 मार्चपर्यंत आणि काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन 30 एप्रिलपर्यंत दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मोठ्या संख्येने महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याचे आढळून आले.
मुदत संपल्यानंतर करण्यात आलेल्या अंतिम पडताळणीत सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 46 लाखांवरून 1 कोटी 66 लाखांपर्यंत खाली आली आहे. अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये ई-केवायसी न करणाऱ्या, उत्पन्न निकषात न बसणाऱ्या, सरकारी नोकरीत असलेल्या तसेच नियमांनुसार पात्रता सिद्ध न करू शकलेल्या महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे आता केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या मते, लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे योजनेवरील आर्थिक भारही कमी होईल आणि निधी अधिक प्रभावीपणे गरजू महिलांपर्यंत पोहोचवता येईल.
Laxman hake : “पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ जरांगेंच्या झुंडीला घाबरले”, सरकारवरही गंभीर आरोप
दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते मे महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे आता पात्र महिलांचे लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लागले आहे. सरकारकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार पुढील हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शासनाने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ फक्त पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा, यासाठीच ही पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.








