व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sting operation : खळबळजनक… केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष दाखवत २० कोटींची...

Sting operation : खळबळजनक… केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष दाखवत २० कोटींची मागणी!

yavatmal-central-corporation-appointment-fraud-bjp-coordinator-sting-operation-three-arrested : भाजप जिल्हा समन्वयकाच्या स्टिंग ऑपरेशनमुळे तिघे जेरबंद

Yavatmal : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राज्यमंत्री दर्जाच्या विविध महामंडळांवर नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २० कोटी २५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कथित ठगांच्या टोळीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड आणि गणेश लालसिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही यवतमाळचे रहिवासी असून त्यांनी केंद्रीय महामंडळांवर नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या आर्थिक व्यवहाराचा प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी लौकिक फुलकर याने नितीन भुतडा यांच्याशी मोबाईल संदेशाद्वारे संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ४२ महामंडळांची यादी पाठवून त्यापैकी पसंतीच्या तीन महामंडळांची निवड करण्यास सांगितले. नियुक्तीची व्यवस्था करणारी व्यक्ती म्हणून गणेश राठोड याचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पाठविण्यात आला होता.

Laxman hake : “पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ जरांगेंच्या झुंडीला घाबरले”, सरकारवरही गंभीर आरोप

यानंतर आरोपींनी केंद्रीय महामंडळावर नियुक्ती मिळवून देण्यासाठी २० कोटी २५ लाख रुपये खर्च येईल, असा दावा केला. या रकमेपैकी पाच टक्के रक्कम टोकन म्हणून आगाऊ द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले. टोकन रक्कम दिल्लीत पोहोचल्यानंतर मंगळवार किंवा बुधवारी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि निवडीसंदर्भात थेट दिल्लीहून फोन येईल, अशी बतावणी आरोपींकडून करण्यात आली होती.

२२ मे रोजी गणेश राठोड याने नितीन भुतडा यांच्याशी व्यवहाराबाबत चर्चा केली. त्यानंतर २३ मे रोजी विश्वजित राठोड याने भाजप कार्यालयात भेट घेऊन व्यवहार अंतिम करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणावर संशय आल्याने नितीन भुतडा यांनी पोलिसांच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला.

योजनेनुसार, ३० मे रोजी सकाळी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात आरोपींना बोलावण्यात आले. टोकन रक्कम देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅगेत रद्दी कागद भरून त्यावर ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवण्यात आले होते. यामुळे बॅगेत मोठी रक्कम असल्याचा भास निर्माण करण्यात आला.

ठरल्याप्रमाणे विश्वजित राठोड आणि गणेश राठोड हे संपर्क कार्यालयात पोहोचले. त्यांनी टोकन रकमेची बॅग ताब्यात घेताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा आरोपी लौकिक फुलकर यालाही अटक करण्यात आली.

Mlc election : अखेर भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार !

या कारवाईमुळे केंद्रीय महामंडळांवरील नियुक्त्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारे इतर कोणाला गंडा घातला आहे का, त्यामागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का, तसेच या रॅकेटचे इतर राज्यांशी काही संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून केंद्रीय संस्थांमधील नियुक्त्यांच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अवधूतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!