Congress in trouble in Amravati, corporators in confusion state for voting : बँक, बच्चू कडू आणि पोटे यांचे त्रिकूट?; काँग्रेसमध्ये ‘लॉबिंग’ आणि ‘हितसंबंधां’ची जोरदार चर्चा
Amravati नागपूर-अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच काँग्रेससमोर अत्यंत नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे थेट ‘आयसीयू’त दाखल झाल्याने आणि त्यांनी प्रचार थांबवल्याने, आज गुरुवारी होत असलेल्या मतदानात नेमके कोणाला मतदान करावे, असा मोठा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांसमोर उभा ठाकला आहे.
काँग्रेसने अद्याप कोणताही व्हीप जारी न केल्याने आणि निर्णय नगरसेवकांवरच सोपवल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.
भाजपचे बलाढ्य उमेदवार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या विरोधात काँग्रेसने हर्षजित देशमुख यांना मैदानात उतरवून सुरुवातीला मोठी हवा निर्माण केली होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच देशमुख अचानक प्रचारातून गायब झाले. नंतर ते नागपूरच्या एका रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आमचे उमेदवार विकले गेले असे जाहीरपणे सांगत पक्षात एकच खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून काँग्रेस नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना समर्थन जाहीर करावे, असे आवाहनही काही नेत्यांनी केले होते. मात्र, मतदानाचा दिवस उजाडला तरी वरिष्ठ पातळीवरून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने काँग्रेस उमेदवाराविनाच निवडणुकीला सामोरी जात असल्याचे चित्र आहे.
हर्षजित देशमुख हे अमरावतीचे नसून काँग्रेसचे साधे किंवा प्राथमिक सदस्यही नाहीत. त्यांची एक सॉफ्टवेअर कंपनी असून, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांच्या कंपनीमार्फत सॉफ्टवेअर सुविधा पुरवली जाते; एवढाच त्यांचा अमरावतीशी संबंध आहे. असे असताना त्यांचे नाव उमेदवारीसाठी कोणी पुढे केले, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांच्यासाठी कोणी लॉबिंग केले, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Vidarbha Farmers : १५ वर्षे मोबदला मिळाला नाही; न्यायालयाने आदेश दिला, अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू असून, देशमुख यांचा संबंध बँकेच्या माध्यमातूनच कडू यांच्याशी आला. दुसरीकडे, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि बच्चू कडू यांचे घनिष्ठ नातेसंबंध सर्वांनाच ठावूक आहेत. त्यामुळेच देशमुखांना उमेदवारी मिळवून देण्यामागे हे छुपा राजकीय हितसंबंधांचे जाळे तर नव्हते ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे दिग्गज नेते यशोमती ठाकूर आणि सुनील देशमुख हे विधानसभेत पराभूत झाले आहेत. पराभव होणार याची आधीच कल्पना असल्याने या नेत्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचे टाळले का, असाही सवाल पक्षांतर्गत विचारला जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार माधव गडिया यांना अवघे १ मत पडले होते आणि आता पुन्हा एकदा पक्षाचा मोठा ‘गेम’ झाल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडीकडे १५३ तर भाजप महायुतीकडे ४५३ मतदार आहेत. त्यातच काँग्रेसच्या उमेदवाराचा पत्ता नसल्याने मतदारांमध्ये कमालीची अनुत्सुकता आहे. त्यामुळे भाजपचे प्रवीण पोटे यांच्या विजयाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून, या निवडणुकीच्या निकालाची केवळ औपचारिकताच शिल्लक उरल्याचे बोलले जात आहे.








