व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचे रक्त इतर अधिकाऱ्यांना चढवा; माजी राज्यमंत्र्याची मुख्य...

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचे रक्त इतर अधिकाऱ्यांना चढवा; माजी राज्यमंत्र्याची मुख्य सचिवांकडे अजब मागणी!

Transfuse Tukaram Mundhe’s Blood into Other Officials; Former Minister of State Subodh Sawji Makes Unusual Appeal to the Chief Secretary : मुंढेंच्या कार्यशैलीचे अनोखे कौतुक; ‘एक बाटली रक्त सर्व खातेप्रमुखांना वाटा’

Dongao अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष कामगिरीचे कौतुक करण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एक अनोखी आणि चर्चेचा विषय ठरलेली मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या शरीरातील एक बाटली रक्त घेऊन ते राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व विभागांच्या खातेप्रमुख अधिकाऱ्यांना थोडे-थोडे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

या पत्रामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सावजी यांनी म्हटले आहे की, तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्रात कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत प्रामाणिकपणे आणि धाडसीपणे काम करत आहेत. त्यांच्या कारवायांमुळे भ्रष्टाचार, भेसळ आणि विविध गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनात शिस्त निर्माण होत आहे.

राज्यातील सर्व खातेप्रमुख आणि शासकीय अधिकाऱ्यांनीही मुंढे यांच्या धर्तीवर काम करावे, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एखाद्या अशक्त रुग्णाला सशक्त व्यक्तीचे रक्त देऊन त्याची प्रकृती सुधारते, त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांचे रक्त मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यास त्यांच्यातही प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि कठोर निर्णयक्षमता निर्माण होईल, असा उपरोधिक उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

Eknath Shinde Shivsena : गल्ली ते दिल्ली विस्ताराची मोहीम… शिंदेंच्या सेनेचं चाललय काय?

सर्व अधिकारी मुंढे यांच्या कार्यशैलीप्रमाणे काम करू लागले तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘सुजलाम्-सुफलाम्’ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या विषयावर तातडीने कारवाई करून पत्राची पोहोच व कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एका सनदी अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी माजी राज्यमंत्र्यांनी केलेली ही आगळीवेगळी मागणी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, प्रशासनातील कार्यसंस्कृती आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!