Vanchit bahujan aghadi won Chandur railway municipal council president post :चांदूर रेल्वे नगरपरिषदेत प्रियंका विश्वकर्मा नगराध्यक्षपदी विजयी
Amravati: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक आणि लक्षवेधी यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला. या निकालामुळे चांदूर रेल्वेच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला असून, जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीत पारंपरिक राजकीय पक्षांना आव्हान देत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र ताकद दाखवली. प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल योजना, रस्ते आणि सामाजिक न्याय यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेल्या प्रचाराचा लाभ पक्षाला झाला. विशेषतः महिला, युवक आणि वंचित घटकांचा मोठा पाठिंबा प्रियंका विश्वकर्मा यांना मिळाल्याचे दिसून आले.
Anil Deshmukh : शरद पवारांच्या नेत्याचा निर्णय योग्य ठरला, काटोलमध्ये शेकापच्या नगराध्यक्ष
निकाल जाहीर होताच चांदूर रेल्वे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी “सत्ता नव्हे, व्यवस्था बदल” या घोषणांचा जयघोष केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा म्हणाल्या,
“हा विजय माझा वैयक्तिक नसून चांदूर रेल्वेच्या जनतेचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील.”
Shyamkumar barve : काँग्रेसच्या खासदाराला ‘घरचा’ आहेर, स्वतःचीच नगरपंचायत गमावली
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा व स्थानिक नेतृत्वाने या निकालाचे स्वागत करत, हा विजय अमरावती जिल्ह्यात पक्षासाठी नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
चांदूर रेल्वे नगरपरिषदेत मिळालेल्या या यशामुळे वंचित बहुजन आघाडीला स्थानिक पातळीवर भक्कम आधार मिळाला असून, जिल्ह्यातील राजकारणात नव्या पर्यायाच्या रूपाने पक्ष पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.








