Lonar Lake : लोणार सरोवराच्या क्षारतेत घट; जैवविविधतेपुढे नवे आव्हान!

Scientific identity at risk if the bio-chain is altered : जीएसडीएचा अहवाल, पाणीपातळी २.८० मीटरने वाढली; जैवसाखळी बदलल्यास लोणारची वैज्ञानिक ओळख धोक्यात

Bulhana उल्कापातामुळे निर्माण झालेले, जगातील एकमेव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रामसर दर्जा प्राप्त लोणार सरोवर सध्या अत्यंत निर्णायक व संवेदनशील टप्प्यावर उभे आहे. एकीकडे सरोवराची पाणीपातळी पूर्वीच्या तुलनेत तब्बल २.८० मीटरने वाढली असून, २०२२ पासून ही वाढ सातत्याने सुरू आहे; तर दुसरीकडे सरोवराच्या पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये सूक्ष्म पण दूरगामी बदल नोंदवले जात आहेत. हे बदल केवळ पाण्यापुरते मर्यादित नसून, सरोवराच्या जैवविविधतेवर व पर्यावरणीय संतुलनावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) यांनी २०१९ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत केलेल्या सखोल अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

Shivsena-MNS alliance : अकोल्यासह विदर्भात ठाकरे बंधूंची युती!

लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जून-जुलै २०२१ आणि ऑक्टोबर २०२५ मधील पाणीपातळीतील लक्षणीय फरक याची साक्ष देतो. या कालावधीत सरोवराच्या पाण्याचा पीएच, एकूण विरघळलेले क्षार (TDS), कडकपणा आणि क्लोराईड यांचा दीर्घकालीन अभ्यास करण्यात आला.

जीएसडीएच्या ऑक्टोबर २०२५ च्या अहवालानुसार, लोणार सरोवरातील मुख्य पाण्याचा पीएच आजही ९ ते ११ दरम्यान असून पाणी तीव्र क्षारीय स्वरूपाचे आहे. मात्र गोमुख, सीता न्हाणी व दर्गा परिसरातील झऱ्यांमध्ये पीएच ७ ते ८ दरम्यान नोंदवला गेला असून, हे पाणी तुलनेने गोड व नैसर्गिक स्वरूपाचे आहे.

Municipal council election : देऊळगाव राजात राजकीय प्रतिष्ठेची निवडणूक

लोणार सरोवराची जैवविविधता ही त्याच्या अतिक्षारीय पाण्यावरच अवलंबून आहे. येथे आढळणारे दुर्मिळ सूक्ष्मजीव, निळे-हिरवे शेवाळ आणि विशिष्ट जैवरासायनिक साखळी जगात अन्यत्र क्वचितच आढळते.
क्षारतेत घट होत राहिल्यास काही पारंपरिक सूक्ष्मजीव नष्ट होण्याची, तर काही नवीन प्रजाती उदयास येण्याची शक्यता आहे. परिणामी लोणारचे मूळ जैववैशिष्ट्य व वैज्ञानिक ओळख धोक्यात येण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत.

एकूण विरघळलेले क्षार (TDS) पाहता, जून-ऑगस्ट २०२० दरम्यान हे प्रमाण ४० ते ६७ हजार मिग्रॅ/लिटर इतक्या धोकादायक स्तरावर गेले होते. मात्र त्यानंतर सातत्याने घट होत असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये हे प्रमाण ३,३०२ ते ३,५०८ मिग्रॅ/लिटर इतके नोंदले गेले आहे. क्लोराईडचे प्रमाणही २०२० नंतर हळूहळू कमी होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर

हे बदल पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाचे असले, तरी त्याचे परिणाम दुहेरी स्वरूपाचे असू शकतात. जैवविविधता, वैज्ञानिक, खगोलीय व पुरातत्वदृष्ट्या त्याचे वेगवेगळे परिणाम संभवतात, त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जीएसडीए, राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था (एनजीआरआय), हैदराबाद आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या अभ्यासानुसार, बाहेरील पाण्याचा शिरकाव हे क्षारता घटण्याचे कारण नाही.
पर्जन्यमानातील बदल, तापमानवाढ व बाष्पीभवन, स्थानिक जलसंचलन, भूगर्भीय रचना आणि हवामानातील चढ-उतार या नैसर्गिक घटकांमुळेच सरोवराच्या पाण्याची रसायनशास्त्रीय रचना बदलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !

लोणार सरोवराचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी खडक, माती, पाणी आणि सूक्ष्मजीव यांचा समन्वित व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. क्षारता घटणे ही सुधारणा नसून, लोणारच्या जैवविविधतेसाठी इशारा ठरू शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.