manoj-jarange-patil-collector-ashima-mittal-anturwali-sarati-maratha-reservation-protest : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल आमनेसामने
Jalna : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी मंगळवारी रात्री अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, चर्चेदरम्यान दोघांमध्ये झालेला संवाद चांगलाच चर्चेत आला.
अशीमा मित्तल यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यावर मनोज जरांगे पाटील काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले. “तुम्हाला सरकारची बाजू घ्यायची आहे का?” असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यावर सरकारची बाजू मांडणे हे आपले काम असल्याचे अशीमा मित्तल यांनी सांगितले.
यानंतर मनोज जरांगे यांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना सरकारमुळे चांगल्या व्यक्तींवरही फाशी घेण्याची वेळ येत असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख आपल्याकडे असल्याचे समजल्याने अशीमा मित्तल यांनी, “मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,” असे उत्तर दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांना तातडीने थांबवत फाशी घेण्याची भाषा करू नका, असे सांगितले. तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्यावर या प्रश्नामुळे टीका होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा प्रश्न हा तुमच्या प्रशासकीय स्तरावरील नसून राज्यस्तरीय असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
Eknath Shinde : ‘बाळासाहेबांना धनुष्यबाण हे चिन्ह प्राणाहून प्रिय होते”
“हा एक प्रश्न सोडवता आला नाही तर तुमच्यावर टीका होईल. हे तुमचं काम नाही, हे तुमच्या लक्षात का येत नाही? तुम्ही या भानगडीत कशाला पडताय?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. तसेच, आपण अभ्यास करून आणि मेहनतीने या पदापर्यंत पोहोचला आहात, त्यामुळे आपली ऊर्जा अशा विषयात वाया घालवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
सरकार जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही जरांगे पयांनी केला. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारशी संबंधित असून जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याशी थेट संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कलेक्टर मॅडम, तुम्ही आलात, पण या गोष्टी तुमच्या स्तरावरील नाहीत. या सर्व मागण्या राज्यस्तरीय आहेत. सरकार तुम्हाला उगाच पुढे करत आहे. तुमची ऊर्जा वाया घालवू नका,” असे जरांगे यांनी म्हटले.
अशीमा मित्तल यांचा आपण सन्मान करतो, मात्र त्यांच्या माध्यमातून सरकारशी चर्चा करण्याचा आपला हेतू नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. “मी तुमचा सन्मान करतो, पण मी तुमचे ऐकणार नाही. यानंतर तुम्ही येऊ नका,” असे सांगत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आंदोलनात वारंवार येऊ नये, अशी भूमिका घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्यातील हा संवाद आता चर्चेचा विषय ठरत आहे.








