eknath-shinde-dhanushyaban-freeze-demand-thackeray-group-supreme-court-hearing : चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
New Delhi : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादाला सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीमुळे पुन्हा वेग आला आहे. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण हे चिन्ह अत्यंत प्रिय होते. त्यामुळे ते गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
शिवसेना पक्षावरील हक्क, निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयातील अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले.
दरम्यान, सुनावणीसाठी दिल्ली येथे दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका केली. “बाळासाहेबांना धनुष्यबाण अतिशय प्राणाहून प्रिय होता. ते हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवायचे. त्यामुळे धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या राजकीय भूमिकेवरही निशाणा साधला. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका याबाबतही त्यांनी ठाकरे गटावर आरोप केले. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून, जनतेच्या न्यायालयातही आपल्याला मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा शिंदे यांनी केला.
दुसरीकडे, मागील सुनावणीदरम्यान कपिल सिबल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेनेत फूट पडल्याचा निष्कर्ष आयोगाने नेमक्या कोणत्या आधारावर काढला, पक्षघटनेनुसार वाद सोडवण्याची पद्धत का स्वीकारली नाही आणि बहुमताचा निर्णय घेताना संघटनात्मक बहुमताचा विचार का करण्यात आला नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
विधिमंडळातील स्वतंत्र बैठका घेणे म्हणजे राजकीय पक्षात फूट पडल्याचा थेट पुरावा ठरू शकत नाही, असा युक्तिवादही सिबल यांनी केला. दोन्ही गटांनी स्वतंत्र बैठका घेतल्या, आपापले गटनेते आणि मुख्य प्रतोद नियुक्त केले तसेच एकमेकांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली. मात्र, या घटनांचा आधार घेत पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. आता शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला जाणार असून, धनुष्यबाण आणि शिवसेनेवरील हक्काच्या या वादात न्यायालयाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








