BJP Mahila Morcha raises ‘Rahul Gandhi Go Back’ slogans during his Nashik visit : महिला आरक्षणावरून नाशिक पेटले, राहुल गांधींचा रस्ता रोखून धरला
Nashik काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपच्या महिला आघाडीने “राहुल गांधी गो बॅक”च्या जोरदार घोषणा देत त्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. नाशिकमध्ये आयोजित काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या शिबिरासाठी राहुल गांधी आले असता, काँग्रेस पक्षाकडून महिला आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा घणाघाती आरोप करत भाजप महिला कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला.
दहा दिवसांपूर्वी पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडली होती, ज्याची दखल शेवटी महायुती सरकारला घेऊन वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा हटवावी लागली होती. त्या वादानंतर आता नाशिकमध्ये पाय ठेवताच पुन्हा एकदा राहुल गांधींना विरोधकांच्या तीव्र आक्रोशाचा सामना करावा लागला आहे.
Manoj Jarange : “तुम्ही फाशी घेण्याची भाषा करू नका”, जरांगेंनी अधिकाऱ्यांना थांबवलं
भाजपने महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणले असून, त्यासोबत मतदारसंघ पुनर्रचना आणि खासदार संख्या वाढवण्याचा प्रस्ताव जोडला आहे. काँग्रेसने या एकत्रित प्रस्तावाला विरोध करत, आरक्षणाच्या आडून भाजप लोकसभा मतदारसंघ वाढवण्याचा छुपा अजेंडा राबवत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसमुळेच महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळत नसल्याचा पलटवार करत भाजप महिला आघाडीने नाशिकमध्ये राहुल गांधींना उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. या गदारोळानंतर आता काँग्रेसच्या शिबिरातून राहुल गांधी या आरोपांना काय उत्तर देतात आणि कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








