Strong warning during business conclave, stir in political circles : बिजनेस कॉन्क्लेव्हदरम्यान जोरदार इशारा, राजकीय वर्तुळात हलचल
Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा ठाम आणि आक्रमक भूमिकेत दिसले आहेत. मुंबईत मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी दाखल झालेल्या जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठे विधान केले आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही पाडणारच; त्याशिवाय मराठ्यांची ताकद कळणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील आज मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लढ्याबाबत तसेच पुढील राजकीय समीकरणाबाबत भाष्य केले. “आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे. सरकारने दिलेल्या काही कमिटमेंट पूर्ण झाल्या आहेत आणि उर्वरितही पूर्ण होतील. आता निवडणुकांचा कालावधी सुरू असल्याने थोडा वेळ लागत आहे,” असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्वत:ला धमक्या येत असल्याचे सांगत, “मी कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही. गाडी अंगावर घालतो अशा धमक्या देतात, पण मी एकटा नाही. महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी माझा मराठा माझ्यासोबत आहे,” असा ठाम पवित्राही त्यांनी स्पष्ट केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत त्यांनी म्हटले की, “मी निवडणुकांमध्ये जास्त हस्तक्षेप करणार नाही. मात्र, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांना सोडणार नाही. त्यांना आम्ही पाडणारच.” यामुळे मराठा समाज राजकीय पातळीवर सक्रिय भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत असून अनेक भागांत या विधानाचे परिणाम जाणवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025च्या उद्घाटनावेळी जरांगे पाटील यांनी समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. “आरक्षणासोबत मराठे उद्योजकही झाले पाहिजेत. मी त्यांना संदेश देणार नाही, उलट घडलेल्या उद्योजकांकडून संदेश घेऊन जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वीच मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा दिला होता. आझाद मैदानावर ते अनशनाला बसले, मुंबईत वाहतूक ठप्प होईपर्यंत समाजाचा आवाज बुलंद केला आणि अखेर सरकारने आरक्षणाबाबतचा जीआर काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणासोबत मराठा आरक्षण मिसळू नये, या भूमिकेतून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.
आता मुंबईतील आजच्या विधानानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेट घेण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आगामी निवडणुकांमध्ये या प्रश्नाचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता अधिकच वाढली असून विविध पक्षांच्या समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
___








