All accused, including MLA Pathan, acquitted in the RSS office attack case : पुराव्यांतील विसंगती ठरली निर्णायक; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Akola शहरात २०१० मध्ये गाजलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालयावरील कथित हल्ला प्रकरणात विद्यमान आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १६ वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित खटल्याचा निकाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांच्या न्यायालयाने दिला.
प्रकरणानुसार, १२ नोव्हेंबर २०१० रोजी शशांक शरदचंद्र जोशी यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना गांधी चौक परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
Ladki Bahin Scheme : ८० लाख लाभार्थींच्या केवायसी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
तक्रारीनुसार, मदन भरगड, साजिद खान पठाण, मब्बा पहलवान, प्रकाश तायडे आणि अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात लाठ्या, जळते पुतळे, फटाके व दगड घेऊन संघ कार्यालयावर हल्ला केला होता. या घटनेत एक पोलिस कर्मचारी तसेच संघाचे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी दंगल, बेकायदेशीर जमाव, मारहाण, मालमत्तेचे नुकसान, घरात घुसखोरी, जाळपोळ करण्याचा प्रयत्न आदी गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. दिलदार खान यांनी साक्षीदारांची सखोल उलटतपासणी करत त्यांच्या जबाबांमधील विसंगती, घटनास्थळी उपस्थितीबाबतचे संशय तसेच तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. साक्षीदारांच्या जबाबांतील तफावत आणि उपलब्ध पुराव्यांतील कमतरता यावर बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद करत आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.
Urdu Ghar Scheme : ‘उर्दू घर’ प्रकल्पावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने; साजीद खान पठाणांवर भाजपचा निशाणा
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. दिलदार खान, ॲड. दुष्यंत चव्हाण, ॲड. राजेश जाधव, ॲड. अमीन खान, ॲड. शर्मा आणि ॲड. दिपेश धायडे यांनी काम पाहिले. या निकालामुळे अकोल्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा या बहुचर्चित प्रकरणाची चर्चा रंगली असून, दीर्घकाळ न्यायप्रविष्ट राहिलेल्या खटल्याचा शेवट अखेर आरोपींच्या निर्दोष मुक्ततेने झाला आहे.








