व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mlc election : अखेर भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर...

Mlc election : अखेर भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार !

vidhan-parishad-election-mahayuti-seat-sharing-finalized-bjp-shiv-sena-ncp-local-authority-constituencies : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला; 18 जूनला मतदान

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतिम सहमती झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून मोठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेने सात जागांवर दावा केला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला वाटा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर झालेल्या चर्चेनंतर भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या असून शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त एक जागा मिळवण्यात यश आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या मतदारसंघांतील अनेक जागा गेल्या दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. संबंधित मतदारसंघांमधील पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही निवडणूक घेता आली नव्हती. आता आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Manoj jarange : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य; मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले

महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 असून त्यापैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून निवडून येतात. यापैकी सध्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे.

या जागांवर यापूर्वी विविध पक्षांचे सदस्य निवडून आले होते. सोलापूरमधून प्रशांत परिचारक, जळगावमधून चंदूभाई पटेल, भंडारा-गोंदियामधून परिणय फुके, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून रामदास आंबटकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, धाराशिव-लातूर-बीडमधून सुरेश धस आणि नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे सदस्य होते. ठाणेमधून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीमधून विप्लव बाजोरिया आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून अंबादास दानवे हे शिवसेनेचे सदस्य होते. अहिल्यानगरमधून अरुणकाका जगताप, पुणेमधून अनिल भोसले आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी होते. तर सांगली-सातारा मतदारसंघातून मोहनराव कदम आणि नांदेडमधून अमर राजूरकर हे काँग्रेसचे सदस्य होते.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

Babanrao taiwade: आरक्षणाला धक्का लागल्यास ६०% ओबीसी रस्त्यावर उतरणार; बबनराव तायवाडे यांचा सरकारला थेट इशारा

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता सर्व पक्षांचे लक्ष उमेदवार निश्चितीवर केंद्रित झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि पक्षनिहाय ताकद लक्षात घेता ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महत्त्वाची राजकीय चाचणी मानली जात आहे.

error: Content is protected !!