व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Navneet Rana : भाजपच्या मनात चाललय काय? नवनीत राणांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा...

Navneet Rana : भाजपच्या मनात चाललय काय? नवनीत राणांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा ‘वेटिंग’वर!

BJP puts Navneet Rana’s political rehabilitation on hold : राष्ट्रीय टीममध्ये स्थान नाही; अमित शाहांच्या भेटीनंतर बळावली होती अपेक्षा

Amravati भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा होताच अमरावतीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी १७ ऑगस्ट रोजी नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या टीममध्ये महाराष्ट्रातील विनोद तावडे, पीयूष गोयल यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्या, तरी नवनीत राणा यांचे नाव दिसून आले नाही.

नवीन राष्ट्रीय टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. काही काळ पक्षाच्या सक्रिय संघटनात्मक भूमिकेपासून दूर असलेल्या नेत्यांना पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याने या फेरबदलाकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणा यांना यावेळी राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या चर्चांना आता काहीसा विराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. या भेटीनंतर राणा यांना पक्ष संघटनेत किंवा केंद्राच्या पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, नव्या राष्ट्रीय टीममध्ये त्यांचा समावेश न झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, भाजपच्या नव्या टीमची रचना आगामी राजकीय आव्हाने आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याला राष्ट्रीय संघटनेत स्थान देण्यापेक्षा पक्षाच्या व्यापक संघटनात्मक समीकरणानुसार जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे.

राज्यसभेची संधीही हुकली

यापूर्वी राज्यसभेच्या जागेसाठीही नवनीत राणा यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. मात्र, अखेरीस त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय टीममध्येही स्थान न मिळाल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

Vanchit Bahujan Aghadi : बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी ऐरणीवर

लोकसभा निवडणुकीनंतर अमरावतीच्या राजकारणात नवनीत राणा यांची भूमिका कोणत्या पातळीवर राहणार, याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत स्थान मिळणे, राज्यसभेची संधी किंवा पक्षातील अन्य महत्त्वाची जबाबदारी यापैकी कोणता पर्याय पुढे येतो, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष आहे.

‘वेटिंग’ किती काळ?

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक जुन्या आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात राजकीय पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र असताना नवनीत राणा यांचे नाव मात्र त्यात दिसले नाही. परिणामी, ‘राजकीय पुनर्वसनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार का?’ हा प्रश्न अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर

मात्र, नवनीत राणा यांना भविष्यात कोणती जबाबदारी मिळेल, याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांकडे राजकीय अंदाज म्हणूनच पाहावे लागणार आहे. दिल्लीच्या राजकारणातील पुढील हालचालींनंतरच राणा यांच्या राजकीय पुनर्वसनाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!