व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vanchit Bahujan Aghadi : बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी ऐरणीवर

Vanchit Bahujan Aghadi : बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी ऐरणीवर

Vanchit Bahujan Aghadi demands removal of the age limit for BARTI’s PhD fellowship : वंचित बहुजन आघाडीचा पाठपुरावा; महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र

Akola डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेतील ३० वर्षांची उच्च वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने लावून धरली आहे. ही वयोमर्यादा रद्द करावी, या मागणीसाठी बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे अधिकृत पत्र सादर करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेतील वयोमर्यादेच्या अटीबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर बार्टीच्या माध्यमातूनही हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी ३० वर्षांची उच्च वयोमर्यादा तातडीने रद्द करावी आणि संशोधनासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा लागू करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड

आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर उशिरा संशोधनाकडे वळतात. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणींमुळे खंड पडतो. त्यामुळे केवळ वयाच्या निकषामुळे पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरू शकते. संशोधनाची गुणवत्ता, शैक्षणिक पात्रता आणि संशोधन क्षमता यांना प्राधान्य देणे आवश्यक असून, केवळ वयाच्या आधारे संशोधनाची संधी नाकारू नये, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे.

बार्टीच्या पत्रात शासन निर्णयाचा संदर्भ

बार्टीच्या अधिकृत पत्रात संबंधित शासन निर्णय, वित्त विभागाच्या सूचना तसेच अधिछात्रवृत्ती योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा संदर्भ देण्यात आला आहे. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी मार्गदर्शक सूचना, जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनाद्वारे वयोमर्यादेच्या अटीमुळे पात्र संशोधक विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. बार्टीने हे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.

Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर

अधिछात्रवृत्तीच्या संख्येतही वाढीची मागणी

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने केवळ वयोमर्यादा रद्द करण्याबरोबरच अधिछात्रवृत्तीच्या संख्येतही आवश्यक वाढ करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

वंचितच्या मागण्या

१. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील ३० वर्षांची वयोमर्यादा तातडीने रद्द करावी.
२. संशोधनासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा लागू करू नये.
३. वयोमर्यादेमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना विशेष संधी द्यावी.
४. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या संख्येत आवश्यक वाढ करावी.
५. योजनेतील नियम व निकष निश्चित करताना विद्यार्थी, संशोधक आणि संबंधित सामाजिक संघटनांशी चर्चा करावी.
६. या विषयावर शासनाने तातडीने स्पष्ट व विद्यार्थीहिताचा निर्णय जाहीर करावा.

Manoj Jarange : ‘शिंदे-फडणविसांमुळेच माझ्यावर उपोषणाची वेळ’; मनोज जरांगेंचा नवा खुलासा

बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाकडे अधिकृत पत्र सादर झाल्याने संशोधक विद्यार्थ्यांच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता शासनाने ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करून संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!