sharad-pawar-ncp-merger-row-mlas-mps-upset-ajit-pawar-group-political-confusion : आमदार- खासदारांमध्ये संभ्रम वाढला, पक्षांतर्गत राजकारण तापले
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील तब्बल २२ आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अजित पवार यांच्या गटासोबत संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा प्रमुख ठरला. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट भूमिका स्पष्ट न करता मौन बाळगल्याचे सांगितले जात आहे. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट करत विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षातील काही आमदार आणि खासदारांमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या गोटातही सध्या अंतर्गत नाराजीचे वातावरण असल्याचा दावा केला जात आहे. काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान दादांच्या गटातील २२ आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना नव्याने हवा मिळाली. पक्षाच्या बैठकीत काही आमदारांनी थेट विलिनीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. मात्र त्यावर स्पष्ट भूमिका न घेतल्याने संभ्रम अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत स्पष्टता हवी असल्याचे बोलले जात आहे. काही आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थेट मत व्यक्त करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने पक्षातील वेगवेगळ्या गटांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
Neet paper leak : इंजिनिअरिंग प्रवेश रखडणार, राज्यातील शैक्षणिक सत्र उशिराने सुरू होण्याची चिन्हे
दरम्यान, गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमागे अजित पवार गटातील वाढती नाराजी कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना वेग आला होता. मात्र बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यावरही विशेष भर देण्यात आला. आगामी काळात सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चांगला समन्वय असल्याचेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पक्षाचे खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जनतेच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असे संकेत बैठकीत देण्यात आले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संबंध आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. विलिनीकरणाच्या चर्चांना अधिकृतरीत्या पूर्णविराम देण्यात आला असला, तरी पक्षातील काही नेत्यांची भूमिका आणि सातत्याने होणाऱ्या भेटीगाठींमुळे भविष्यात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.








